दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विशाखापट्टणम कसोटीत भारतीय संघाने २०३ धावांनी विजय मिळवला. सलामीवीर रोहित शर्माने या कसोटीत दोन्ही डावांमध्ये शतक झळकावत आपली कसोटी संघातली निवड सार्थ ठरवली. त्याच्या या खेळीवर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा चांगलेच खुश झाले आहेत. भारतीय संघाला रोहितच्या रुपाने दुसरा विरेंद्र सेहवाग सापडला असल्याची प्रतिक्रीया शर्मा यांनी दिली. ते ANI या वृत्तसंस्थेशी बोलत होते.

“रोहित अतिशय गुणवान खेळाडू आहे, प्रत्येकाला हे माहितीच आहे. तो आतापर्यंत त्याच्या वन-डे क्रिकेटमध्ये फलंदाजीसाठी ओळखला जायचा, मात्र त्याने आता मी कसोटी क्रिकेटमध्येही अशीच फलंदाजी करु शकतो हे दाखवून दिलं आहे. भारताकडे आता स्थिरावलेल्या चांगल्या सलामीवीरांची जोडी आहे. रोहित संघाला गरज असेल त्यावेळी आक्रमक खेळ करु शकतो. विश्वचषकात पाच शतकं झळकावत त्याने कसोटी संघात आपलं स्थान बळकावलं आहे. माझ्यामते भारतीय संघाला आपला दुसरा विरेंद्र सेहवाग सापडला आहे.” राजकुमार शर्मा यांनी रोहितच्या खेळीचं कौतुक केलं.

आणखी वाचा- IND vs SA : भारताकडून पराभूत झाल्यावर आफ्रिकेचा कर्णधार डु प्लेसिस म्हणतो…

लोकेश राहुलच्या खराब कामगिरीमुळे रोहित शर्माला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी संघात स्थान देण्यात आलं होतं. पहिल्या डावात रोहितने मयांकच्या साथीने त्रिशतकी भागीदारी करत भारताला सर्वोत्तम सुरुवात करुन दिली. यानंतर दुसऱ्या डावातही रोहितने गरज असताना आक्रमक फटकेबाजी करत भारताला कमी षटकांत त्रिशतकी आघाडी मिळवून दिली. दरम्यान ३ सामन्यांच्या मालिकेत भारत सध्या १-० ने आघाडीवर आहे. या मालिकेतला दुसरा सामना १० ऑक्टोबररोजी पुण्याच्या गहुंजे मैदानावर खेळवला जाणार आहे.