चेन्नई येथेली चेपॉक स्टेडियमवर मंगळवारी भारतीय संघावर विराट पराभवाची नामुष्की ओढावली. जेम्स अँडरसनच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांनी शरणागती पत्करल्यानं इंग्लंडने पहिल्या कसोटी सामन्यात यजमानांवर २२७ धावांनी दणदणीत यश संपादन केलं. या विजयासह इंग्लंड संघानं चार कसोटी सामन्याच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.

चेपॉक स्टेडियमवर भारतीय संघ तब्बल २२ वर्षांनंतर पराभूत झाला आहे. मागील २२ वर्षात भारतीय संघाला चेन्नईमध्ये कसोटी सामन्यात एकही पराभव पत्करावा लागला नव्हता. यापूर्वी चेन्नईमध्ये १९९९ साली भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला होता. १९९९ मध्ये पाकिस्तान संघानं चेन्नईच्या मैदानावर कसोटीत भारताचा पराभव केला होता. त्यानंतर भारतीय संघ चेन्नईमध्ये अपराजित राहिला होता. पण पाहुण्या इंग्लंड संघानं पराभूत करत भारताच्या गडाला सुरुंग लावला आहे.

आणखी वाचा- IND vs ENG : दुसऱ्या कसोटीत ‘या’ खेळाडूला संधी मिळायला हवीच : गावसकरांचं स्पष्ट मत

पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला तब्बल २२७ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. पाचव्या दिवशी ४२० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी पुन्हा एकदा खराब कामगिरी केली. भारताचा दुसरा डाव फक्त १९७ धावात संपुष्ठात आला. मालिकेतील दुसरा कसोटी सामना चेन्नईतील याच मैदानावर १३ फेब्रुवारीपासून सूरू होणार आहे. हा सामना जिंकून विराट कोहली आणि टीम मालिकेत १-१ अशी बरोबर करतो का, याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष असेल.