न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीतील सामन्यामध्ये २४० धावांचा पाठलाग करताना भारतीय डाव कोलडमला. भारताचे दोन्ही सलामीवीर आणि कर्णधार कोहली संघाचा धावफलक ५ वर असताना तंबूत परतले. सलामीवीर के. एल. राहुल, रोहित शर्मा आणि विराट कोहली प्रत्येकी एक धाव करुन बाद झाले. भारताचा डाव गडगडल्यानंतर पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्या यांनी भारताचा डाव सावरला. मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात पंतही झेलबाद झाला. अखेर सातव्या क्रमांकावर धोनी मैदानात उतरला असून आता भारताच्या सर्व आशा धोनीवर अवलंबून आहेत. इतिहास पाहिला तर भारत धावांचा पाठलाग करताना धोनी नाबाद राहून केवळ दोनदा पराभूत झाला आहे. त्यामुळेच धोनी नाबाद राहिला आणि संपूर्ण ५० षटकांचा खेळ झाला तर भारत हा सामना जिंकू शकतो असं म्हणता येईल.

धावांचा पाठलाग करण्यात धोनी पटाईत आहे. अनेक वेळा भारताचा डाव गडगडल्यानंतर मधल्या फळीत फलंदाजीला येणाऱ्या धोनीने संघाला यशस्वीरित्या लक्ष्य पूर्ण करण्यात मदत केली आहे. या खेळींदरम्यान अनेकदा धोनी नाबाद राहिला आहे. मात्र केवळ दोनदाच धावांचा पाठलाग करताना धोनी नाबाद राहूनही भारताचा पराभव झाला आहे. ३ जानेवारी २०१३ रोजी कोलकत्यामध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळताना भारत २५० धावांचा पाठलाग करत होता. त्यावेळी एकीकडे विकेट्स पडत असताना धोनी मैदानात टिकून होता. अखेर भारतीय संघाचा डाव ४८ व्या षटकात सर्वबाद १६५ वर संपला. या सामन्यात धोनी ५४ धावा करुन नाबाद राहिला. त्यानंतर असा प्रकार याच विश्वचषकामध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात घडला. ३३७ धावांचा पाठलाग करताना भारताला ५० षटकांमध्ये केवळ ३०६ धावांपर्यंत मजल मारता आली. या समान्यात धोनी ४२ धावांवर नाबाद राहिला होता.

दरम्यान, आजच्या सामन्यातही धोनी विश्वचषक २०११ मधील अंतीम सामन्यासारखा खेळ करत भारताला विजय मिळवून देतो का याकडे सर्व भारतीयांचे लक्ष्य लागून राहिले आहे.