ऑलिम्पिक टेस्ट इव्हेंट स्पर्धेत भारताच्या पुरुष हॉकी संघाने बुधवारी न्यूझीलंडवर ५-० असा दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. तसेच या विजयामुळे भारतीय संघाने स्पर्धेतील राऊंड रॉबीन फेरीत न्यूझीलंडने केलेल्या पराभवाचा वडपादेखील काढला.

न्यूझीलंड विरूद्धच्या अंतिम सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंनी मैदानाच्या मध्यरेषेवर खेळ खेळण्यावर अधिक भर दिला होता. भारताने सातव्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळवला, परंतु त्यावर गोल करण्यात अपयशी ठरले. मात्र कर्णधार हरमनप्रीतने पुन्हा मिळालेल्या कॉर्नरवर गोल करताना भारताला आघाडी मिळवून दिली. कर्णधार हरमनप्रीत सिंगने ७ व्या मिनिटाला भारताला गोलचे खाते उघडून दिले.

लगेचच शमशेर सिंगने १८ व्या मिनिटाला गोल करून आघाडी वाढवली. त्यानंतर पुढच्या १० मिनिटात झटपट ३ गोल झाले. निलकांत शर्माने २२ व्या मिनिटाला, गुरसाहबजीत सिंगने २६ व्या मिनिटाला आणि मनदीप सिंगने २७ व्या मिनिटाला गोल करून भारताला भक्कम आघाडी मिळवून दिली आणि ती आघाडी शेवटपर्यंत टिकवली. राऊंड रॉबीन फेरीत न्यूझीलंडने भारताला २-१ ने पराभूत केले होते.

या विजयावर बोलताना कर्णधार हरमनप्रीत सिंग म्हणाला की आम्ही अतिशय चांगला खेळ केला. सामन्यात जेव्हा जेव्हा संधीवर मिळाली, तेव्हा गोल करण्यात आम्ही यशस्वी ठरलो. अंतिम सामना हा आव्हानात्मक असतो. तशातच आम्ही राऊंड रॉबीन फेरीत न्यूझीलंडकडून हरलो होतो. त्यामुळे आम्हाला आमची रणनीती आखणे शक्य झाले. त्या सामन्यातील चुका या सामन्यात आम्ही टाळल्या. त्याचेच आम्हाला फळ मिळाले.