|| धनंजय रिसोडकर

आशियाईत ऐतिहासिक कामगिरी बजावल्याचे ढोल आता शांत होऊ लागले आहेत. पदकविजेते आणि पदकापासून वंचित असे सर्व खेळाडू भारतात परतल्यानंतर संबंधित खेळाच्या सामूहिक कामगिरीचे आणि मूल्यांकनाचे त्यांच्या प्रशिक्षकांकडूनदेखील बारकाईने आकलन केले जात आहे. अ‍ॅथलेटिक्समध्ये सर्वाधिक पदकांची लयलूट केल्याने भारताला आठवे स्थान गाठण्यात यश मिळाले. मात्र, अन्य खेळांतील पदकांचा आणि स्पर्धेपूर्वीच्या दाव्यांचा अदमास घेतल्यास असे लक्षात येते की, नेमबाजी आणि कुस्ती वगळता अन्य दाव्यांमध्ये वास्तवापेक्षा वल्गनाच अधिक होती. भारताने कुराश, वुशू, ब्रिजसारख्या नवीन खेळांमध्ये पदके मिळवली असली तरी कबड्डी, हॉकी या पारंपरिक खेळांमध्ये बसलेला झटका हा अधिक धक्कादायक होता. ज्या खेळांवर भारताचा ठसा होता आणि स्पर्धेच्या प्रारंभापूर्वीपासून जी हक्काची सुवर्णपदके म्हणून गणली जात होती, ती पदके गमावणे हा भारतासाठी धोक्याचा इशारा आहे, हे वेळीच लक्षात घ्यायला हवे.

भारतीय संघाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील कामगिरीचा लेखाजोखा घेताना भारताचे कबड्डीतील हुकलेले सुवर्णपदक ही सर्वाधिक मोठी जखम म्हणून स्मरणात सलणारी आहे. भारतीय मातीतला खेळ आणि ज्यात सलग ७ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने सुवर्ण मिळवलेले आहे, त्या कबड्डीच्या खेळात सुवर्ण नाही तर किमान रौप्य पदकदेखील भारत मिळवू शकला नाही. पुरुषांच्या संघाला दोन देशांकडून पराभव सहन करत कांस्यपदक स्वीकारावे लागणे ही या आशियाई क्रीडा स्पर्धेतील सर्वात मोठी नामुष्की होती. त्याखालोखाल भारताला दुसरा धक्का बसला तो पुरुष हॉकीत. साखळी सामन्यांमध्ये विक्रमी ७६ गोल करीत भारताने सुवर्णपदकाचा दावेदार म्हणून उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. मात्र, मलेशियाविरुद्ध उपांत्य सामन्यातील प्रत्येक सत्रात आधी गोल करून आघाडी घेतल्यानंतर ती गमावणे आणि शेवटच्या मिनिटाला गोल स्वीकारण्याची भारताची जुनी खोड या वेळी पुन्हा उफाळून आली. त्यामुळेच सामना पेनल्टी शूटऑफमध्ये गेला आणि पराभव स्वीकारण्याची वेळ आली.  नोव्हेंबरमध्ये हॉकीचा विश्वचषक भुवनेश्वरला होणार असल्याच्या पाश्र्वभूमीवर आशियाईत सुवर्ण पटकावत विश्वचषकावर मजबूत दावा करण्याचा मनसुबा त्यामुळे धुळीस मिळाला. कांस्यपदकाच्या सामन्यात पाकिस्तानवर मात करण्यात यश मिळाले म्हणून काही प्रमाणात पत राखली गेली. अन्यथा हॉकीपटू आणि हॉकीप्रेमींसाठी तो धक्का सहन करण्याच्याही पलीकडचा ठरला असता.

कुस्तीमध्ये भारताचे दावे मोठे असले तरी प्रत्यक्षात केवळ बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनाच सुवर्णपदक मिळवून देणे शक्य झाले. सुशीलकुमार हा केवळ गतपुण्याईवरच कायम असल्याचे या स्पर्धेत अधोरेखित झाले. त्यामुळे दोन वर्षांनंतर येणाऱ्या ऑलिम्पिकचा विचार केल्यास भारताला पदकांची आशा केवळ बजरंग आणि विनेशकडूनच ठेवता येणार आहे. बॅडमिंटनमध्ये सिंधू आणि सायनाने रौप्य आणि कांस्यपदकांची कमाई केली असली तरी सुवर्णपदक हुकल्याची चुटपुट निश्चितच आहे. विशेष म्हणजे तैवानच्या ताई झु इंगकडूनच दोघींना पराभव पत्करावा लागल्याचे शल्य अधिक आहे. पुरुष एकेरीत तर भारताच्या सर्वच प्रमुख दावेदारांनी नांगी टाकल्याचे चित्रदेखील क्लेशकारक होते. कम्पाऊंड तिरंदाजीत पुरुष आणि महिलांनी सांघिकमध्ये कोरियाला दिलेली तुल्यबळ लढत भारताला ऑलिम्पिकमध्ये पदकाची संधी मिळू शकते, त्याचे संकेत देणारी होती, तर बॉक्सिंगमध्ये अमित पानघलने पटकावलेले सुवर्ण हे गतऑलिम्पिक पदकविजेत्याला पराभूत करून मिळवलेले असल्याने त्या पदकाचे मोल अधिक आहे; परंतु अन्य बॉक्सर्सनी भारताची निराशा केली. रोहन बोपन्ना आणि दिविज शरणने टेनिस दुहेरीतील सुवर्ण मिळवून दिले असले तरी त्या कामगिरीवर ऑलिम्पिकमध्ये पदकाची स्वप्ने पाहू नयेत, कारण ऑलिम्पिकमधील दुहेरीचा दर्जा हा आशियाईच्या तुलनेत खूप वरचा असतो. नौकानयनमध्ये भारताने सांघिकमध्ये सुवर्णपदक मिळवले. मात्र, सिंगल स्कल प्रकारात तांत्रिक बिघाड अन् आजारपणामुळे हक्काचे सुवर्णपदक मिळण्याची अपेक्षा दत्तू भोकनळ पूर्ण करू शकला नाही. अश्वारोहणात तब्बल ३२ वर्षांनी मिळालेले पदक आणि टेबल टेनिसमध्ये मिळालेली दोन पदके भारताने या खेळांमध्येदेखील प्रगतीच्या दिशेने पावले टाकण्यास प्रारंभ केल्याची द्योतक आहेत. अ‍ॅथलेटिक्स वगळता अन्य खेळांमधील कामगिरी पदकांच्या दृष्टीने सुखद भासत असली तरी पारंपरिक खेळांतील मक्तेदारी संपुष्टात आल्याचे संकेत आशियाई स्पर्धेने आपल्याला दिले आहेत.

नेमबाजीत कळसाध्यायाकडे..

नेमबाजीत राहीने मिळवलेले सुवर्ण हा आशियाईतील सर्वाधिक सुखद धक्का होता. कोपराच्या दुखापतीमुळे वर्षभर खेळापासून दूर राहूनदेखील परतल्यानंतरचा तिचा सुवर्णवेध म्हणजे पुनरागमन कसे झोकात करायचे, याचाच जणू वस्तुपाठ होता. त्याशिवाय अवघ्या १६ वर्षांच्या सौरभ चौधरीने १० मीटर एअर पिस्तूलमध्ये केलेली सुवर्णमय कामगिरी आणि त्याच गटातील अभिषेक वर्माचे कांस्यपदक अभिमानास्पद होते. १५ व्या वर्षांतील शार्दूल विहानचे रौप्य हे भारताला नेमबाजीमध्ये उज्ज्वल भविष्यकाळ असल्याचे सांगून गेले. ज्या वयात मुले शाळा संपवून पुढील करिअरचा विचार सुरू करतात, त्या वयात या मुलांनी त्यांच्या कारकीर्दीतील कळसाध्यायाकडे घेतलेली झेप नक्कीच सुखावणारी आहे. पंधरा-सोळा वर्षांतील मुले, मुली अशी दमदार कामगिरी करताना बघून ऑलिम्पिकमध्ये भारताला नेमबाजीत तीन-चार पदके तरी निश्चित मिळतील असे चित्र दिसू लागले आहे.

dhananjay.risodkar@expressindia.com