आज श्रीलंकेविरुद्ध पराभवाची परतफेड करण्यासाठी उत्सुक
निदाहास ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा
कर्णधार रोहित शर्मा धावांसाठी झगडत आहे, हीच निदाहास चषक तिरंगी ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाची प्रमुख चिंता आहे. मात्र सोमवारी श्रीलंकेशी सामना करताना सलामीच्या लढतीमधील पराभवाची परतफेड करण्यासाठी भारतीय संघ उत्सुक आहे.
नियमित संघनायक विराट कोहलीनंतर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये धावांचे सातत्य राखणारा धडाकेबाज फलंदाज अशी रोहितची ओळख आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेपासून तो धावांच्या अपेक्षांची पूर्ती करू शकलेला नाही.
महेंद्रसिंग धोनीचा वारसदार म्हणून पाहिल्या जाणाऱ्या ऋषभ पंतने अद्याप आपल्या संधीला न्याय दिलेला नाही. लोकेश राहुलसारखा गुणी फलंदाज संधीच्या प्रतीक्षेत आहे. राहुलला श्रीलंकेविरुद्ध संघात स्थान दिल्यास त्याचा सलामीवीर म्हणून वापर करता येऊ शकतो. या परिस्थितीत रोहितला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरावे लागेल.
रोहितच्या नेतृत्वाखालील भारताच्या दुसऱ्या फळीला तिरंगी क्रिकेट स्पर्धेतील अभियानाला अपेक्षेनुसार सुरुवात करता आली नाही. श्रीलंकेविरुद्धच्या सलामीच्याच सामन्यात भारताने पाच विकेट राखून हार पत्करली. मात्र त्या पराभवातून सावरत दुसऱ्या सामन्यात बांगलादेशचा सहा विकेट राखून पराभव केला. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात चुका सुधारण्याची संधी भारताला असेल.
आतापर्यंत तिन्ही संघांनी प्रत्येकी एकेक सामना जिंकला असल्यामुळे कोणता संघ वरचढ ठरू शकेल, हे सांगणे कठीण आहे. मात्र निव्वळ धावगतीआधारे श्रीलंकेचा संघ गुणतालिकेत आघाडीवर आहे. मात्र सोमवारच्या सामन्यातील विजयासह भारत गुणतालिकेत अव्वल स्थानावर जाऊ शकेल.
दोन्ही सामन्यांत सलग अर्धशतके झळकावून सलामीवीर शिखर धवनने आपल्या सातत्याचा प्रत्यय दिला आहे. श्रीलंकेविरुद्ध त्याने ४९ चेंडूंत ९० धावा केल्या, तर बांगलादेशविरुद्ध ४३ चेंडूंत ५५ धावा केल्या. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील कसोटी मालिकेत अपेक्षित कामगिरी न करू शकणाऱ्या धवनने नंतर मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये चांगल्या धावा केल्या होत्या. मात्र रोहित गेल्या पाच ट्वेन्टी-२० सामन्यांत अनुक्रमे १७, ०, ११, ० आणि २१ अशा धावा करू शकल्या आहेत. त्या तुलनेत मनीष पांडेने स्पर्धेतील दोन सामन्यांत जबाबदारीने (अनुक्रमे ३७, २७ धावा) फलंदाजी केली आहे. पुनरागमन करणाऱ्या सुरेश रैना आणि दिनेश कार्तिक यांनीही मधल्या फळीला न्याय दिला आहे.
गोलंदाजीत जयदेव उनाडकटने अधिक गोलंदाजीत अधिक सातत्य राखण्याची आवश्यकता आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज उनाडकटने दोन सामन्यांत ४ बळी घेतले आहेत. मात्र बऱ्याच धावा दिल्या आहेत. मात्र वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल आणि विजय शंकर या नव्या गोलंदाजांनी आपली कामगिरी चोख बजावली आहे.
दुसरीकडे श्रीलंकेच्या संघाला शनिवारी बांगलादेशकडून पत्करलेल्या धक्कादायक पराभवातून सावरावे लागणार आहे. श्रीलंकेचे २१५ धावांचे आव्हान बांगलादेशने पाच फलंदाजांच्या मोबदल्यात १९.४ षटकांत पेलले. ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील हा चौथ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावांचा पाठलाग होता. श्रीलंकेच्या गोलंदाजांवर बांगलादेशच्या फलंदाजांनी जोरदार हल्ला केला. फलंदाजीमध्ये श्रीलंकेची मदार दोन ‘कुशल’ फलंदाजांवर आहे. परेराने दोन सामन्यांत ६६ आणि ७४ धावा केल्या आहेत, तर मेंडिसने बांगलादेशविरुद्ध ५७ धावा केल्या आहेत.
संघ
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), लोकेश राहुल, सुरेश रैना, मनीष पांडे, दिनेश कार्तिक (यष्टिरक्षक), दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, विजय शंकर, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, ऋषभ पंत (यष्टिरक्षक).
श्रीलंका : दिनेश चंडिमल (कर्णधार), सुरंगा लकमल (उपकर्णधार), उपुल थरंगा, दनुष्का गुणतिलका, कुशल मेंडिस, दसून शनाका, कुशल जनीथ परेरा, थिसारा परेरा, जीवन मेंडिस, इसुरू उडाना, अकिला धनंजया, अमिला अपोन्सो, न्यूवान प्रदीप, दुष्मंता चामीरा, धनंजया डी’सिल्व्हा.
सामन्याची वेळ : सायं. ७ वा.
थेट प्रक्षेपण : डीस्पोर्ट्स, जिओ टीव्ही अॅप, रिश्ते सिनेप्लेक्स.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 12, 2018 3:43 am