देशभरात करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता, बीसीसीआयने आयपीएलचा तेरावा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. मात्र ही स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला ४ हजार कोटींचं नुकसान होण्याची शक्यता आहे. करोना लॉकडाउन काळात आयसीसीशी संलग्न असलेल्या प्रत्येक क्रिकेट बोर्डाला आर्थिक नुकसान झालेलं आहे. वर्षाअखेरीस ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० विश्वचषक रद्द होण्याचे संकेत मिळत आहेत, या जागेवर बीसीसीआयचं आयपीएलचं आयोजन करता येईल का याची चाचपणी करत आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाचा अष्टपैलू खेळाडू सुनिल नरीन आयपीएलमध्ये खेळण्यासाठी उत्सुक आहे.

“स्पर्धा कोणतीही असो, KKR चा संघ जिथे कुठे असेल तिकडे मला खेळायला आवडेल. पैसे माझ्यासाठी महत्वाचा मुद्दा नाही, भारतामध्ये प्रत्येकवेळा आमचं जे स्वागत होते, त्याची मला फार आठवण येते. आमच्या आवडी-निवडीबद्दल लोकांना माहिती झालेली आहे हे पाहून आम्हाला खरंच खूप आनंद होतो. भारतामध्ये खेळत असताना आम्हाला खूप मजा येते, प्रत्येकवेळी आयपीएलसाठी भारतात येतो त्यावेळी मी माझ्या दुसऱ्या घरी आलोय असं वाटतं.” सुनिल नरीन KKR च्या इन्स्टाग्राम लाईव्ह चॅटमध्ये बोलत होता.

२९ मार्चपासून आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सुरुवात होणार होती. मात्र देशातली करोनाची परिस्थिती पाहता बीसीसीआयने १५ एप्रिलपर्यंत ही स्पर्धा पुढे ढकलली. मात्र तोपर्यंत परिस्थिती नियंत्रणात न आल्यामुळे बीसीसीआयने पुढील सूचना मिळेपर्यंत ही स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.