ट्वेन्टी-२० विश्वचषकात कोणता संघ जिंकेल, हे आता सांगता येणार नाही. पण आतापर्यंतच्या कामगिरीचा विचार करता भारत प्रबळ दावेदार असल्याचे मत इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गनने व्यक्त केले आहे.
‘‘ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये भारताची कामगिरी चांगली झाली आहे. त्याचबरोबर वातावरण आणि खेळपट्टय़ांचाही त्यांना चांगला अंदाज आहे. त्यामुळे यजमान भारताला विश्वचषकाचे प्रबळ दावेदार समजले जात आहे. आमच्या संघातही बरेच विजयवीर आहेत. त्यामुळे बाद फेरीत पोहोचण्याचा आम्हाला विश्वास आहे,’’ असे मॉर्गन म्हणाला.
सकारात्मक क्रिकेटचा फायदा होणार – स्टोक्स
गेल्या दीड वर्षांमध्ये आम्ही सकारात्मक क्रिकेट खेळलो आहोत आणि त्याचाच फायदा आम्हाला विश्वचषकात होईल. आम्ही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभूत झालो असलो तरी त्यापूर्वी आम्ही सलग सहा सामने जिंकले होते, असे बेन स्टोक्स म्हणाला.
‘आम्हाला आयपीएल खेळायचे आहे’
कौंटी क्रिकेटच्या मोसमामुळे इंग्लंडच्या क्रिकेटपटूंना आयपीएलमध्ये खेळता येत नाही. पण आयपीएलमध्ये खेळण्यासाठी आम्हीही आसुसलेलो आहोत, असे मोईन अली, बेन स्टोक्स आणि लायम प्लंकेट यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 10, 2016 4:52 am