भारताच्या कनिष्ठ फेड चषक संघाने येथे सुरू असलेल्या आशिया/ओशियाना अंतिम पात्रता टेनिस स्पध्रेत तिसरे स्थान पटकावून जागतिक गटाची पात्रता मिळवली. भारताने अखेरच्या साखळी सामन्यात न्यूझीलंडवर २-१ असा विजय मिळवला.

महक जैनने भारताला १-० अशी आघाडी मिळवून देताना निना परीपोव्हीचचा ६-१, ६-१ असा पराभव केला. त्यात सत्विका सामाने भर घातली. दुसऱ्या लढतीत तिने ६-२, २-६, ६-३ अशा फरकाने व्हॅलेंटीना इव्हानोव्हचा पराभव करून भारताची आघाडी २-० अशी भक्कम केली. दुहेरीत मात्र शिवानी इंगळे-सात्विका सामा या जोडीला पराभव पत्करावा लागला. न्यूझीलंडच्या तॅमरा अँडरसन आणि निना यांनी ६-२, ६-३ असा विजय मिळवला.

जपानविरुद्धचा (०-२) पराभव वगळल्यास भारताने श्रीलंका (३-०), उझेबकिस्तान (३-०), कोरिया (२-१) आणि ऑस्ट्रेलिया (२-०) यांच्यावर विजय साजरा केला होता. भारतीय संघाच्या या कामगिरीचे अखिल भारतीय टेनिस असोसिएशनचे कार्याध्यक्ष अनिल खन्ना यांनी कौतुक केले.

या स्पध्रेत कोरियासारखे आव्हानात्मक प्रतिस्पर्धी आमच्यासमोर होते आणि ऑस्ट्रेलियावरील विजय हा अनपेक्षित म्हणावा लागेल. इतर संघांच्या तुलनेत दुहेरीत आम्ही कमकुवत होतो. मात्र मुलींनी सकारात्मक दृष्टिकोन दाखवला.

– अंकिता भांब्री, भारतीय टेनिस संघाच्या प्रशिक्षक