दक्षिण कोरियामधील इन्चॉन शहरात होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पध्रेसाठी जाहीर झालेल्या भारतीय कबड्डी संघात महाराष्ट्राच्या तीन खेळाडूंना स्थान मिळाले आहे. पुरुष संघात सांगलीच्या नितीन मदनेला प्रथमच संधी देण्यात आली आहे, तर महिला संघात मुंबई उपनगरची अभिलाषा म्हात्रे आणि पुण्याची किशोरी शिंदे यांचा समावेश करण्यात आला आहे.
भारतीय हौशी कबड्डी असोसिएशनने प्रो-कबड्डी लीग संपताच लगेच दुसऱ्या दिवशी भारतीय संघ जाहीर केला आहे. प्रो-कबड्डीमध्ये आपल्या कामगिरीने लक्ष वेधणाऱ्या खेळाडूंचाच भारतीय पुरुष संघात भरणा आहे. या स्पध्रेत बंगाल वॉरियर्सकडून खेळणाऱ्या मदनेने आपल्या चतुरस्र चढायांनी छाप पाडली होती. भारताचे दोन्ही संघ भोपाळच्या साई केंद्रात ५ ते २१ सप्टेंबदरम्यान होणाऱ्या सराव शिबिरानंतर २३ सप्टेंबरला नवी दिल्लीहून इन्चॉनला प्रयाण करतील.
२०१२मध्ये झालेल्या विश्वचषक कबड्डी स्पध्रेत आणि गतवर्षी इन्चॉनलाच झालेल्या आशियाई इन्डोअर आणि मार्शल आर्ट्स क्रीडा स्पध्रेतील विजेत्या भारतीय संघातील अभिलाषाचा या संघात समावेश आहे. २०१०मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पध्रेत पुण्याच्या दीपिका जोसेफचा भारतीय संघात समावेश होता, परंतु दुखापतीमुळे तिला यंदा मुकावे लागले आहे.

भारतीय संघात प्रथमच माझी निवड झाली आहे.  या निवडीमुळे माझी आजपर्यंतची कबड्डीची मेहनत सार्थकी लागली आहे. प्रो-कबड्डीमध्ये गेले महिनाभर खेळल्यामुळे एखाद्या स्वप्नासारखेच सारे प्रत्यक्षात घडत असल्याची अनुभूती येते आहे. अनेक अनुभवी खेळाडूंसोबत प्रो-कबड्डीमध्ये खेळायला मिळाले, त्यामुळे चांगला सराव झाला आहे. आता सर्वत्र मला लोक ओळखू लागले आहेत. भारताचे व महाराष्ट्राचे नाव उंचावण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन.   नितीन मदने

आशियाई क्रीडा स्पध्रेसाठी भारतीय संघात स्थान मिळाल्याचा अतिशय आनंद झाला आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि नवी मुंबई महानगरपालिका यांच्या पाठबळामुळेच मला हे स्वप्न साकारता आले. भारतीय संघाने आतापर्यंत झालेल्या विशेष शिबिरांमध्ये कोरिया, थायलंड आणि इराण या प्रतिस्पर्धी संघांविरुद्ध खेळण्यासाठी आम्ही व्यूहरचना आखली आहे. ई. भास्करन आणि नीती दडवे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सुवर्णपदक जिंकू. – अभिलाषा म्हात्रे

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे मी प्रतिनिधित्व करावे असे माझ्या आईवडिलांचे स्वप्न होते. भारताला सुवर्णपदक मिळवून देण्यासाठीच खेळणार आहे. माझ्यावर पकडीची मुख्य जबाबदारी असली तरी वेळ आल्यास चढाईतही अव्वल कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न राहील. महाराष्ट्राकडून दोन वेळा तर रेल्वे संघाकडून पाच वेळा राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाल्यामुळे मला भारतीय संघातील अन्य खेळाडूंसमवेत खेळताना कोणत्याही अडचणी
येणार नाहीत.  –किशोरी शिंदे

भारताचा पुरुष संघ
राकेश कुमार, सुरजीत सिंग, नवनीत गौतम, अजय ठाकूर, जसवीर सिंग, अनुप कुमार, गुरप्रीत सिंग, राजगुरू, नितीन मदने, सुरजीत नरवाल, प्रवीण कुमार, मनजीत चिल्लर. प्रशिक्षक : बलवान सिंग, जे. उदय कुमार. राखीव खेळाडू : काशिलिंग आडके, सूरज देसाई, धर्मराज चेरलाथन, शब्बीर बापू शरफुद्दीन.

भारताचा महिला संघ
तेजस्विनी बाई, ममता पुजारी, प्रियांका, अभिलाषा म्हात्रे, सुमित्रा शर्मा, जयंती, कविता, कविता देवी, अनिता मावी, किशोरी शिंदे, पूजा ठाकूर, सुश्मिता पोवार. प्रशिक्षक : नीता दडवे, ई. भास्करन्. राखीव खेळाडू : पायल चौधरी, रणदीप कौर, दीव कृपा, काकोली बिस्वास.