इंग्लंडमधील क्रिकेट चाहत्यांना सामान्यत: सभ्य समजलं जातं. मात्र दुसऱ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी याच्या विरुद्ध चित्र पाहायला मिळालं. सीमा रेषेवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या भारताच्या केएल राहुलवर शॅम्पनचे कॉर्क फेकल्याची घटना घडली. इंग्लंड खेळत असलेल्या पहिल्या डावातील ६९ व्या षटकादरम्यान हा प्रकार घडला. यावेळी मोहम्मद शमी इंग्लंडचा कर्णधार जो रूट याला गोलंदाजी करत होता. या प्रकारामुळे काही काळ सामना थांबवण्यात आला होता.

या प्रकारामुळे भारतीय कर्णधार विराट कोहलीने मैदानातच राग व्यक्त केला. शॅम्पेन कॉर्क जिथून फेकलं तिकडे परत फेक असं सांगताना तो व्हिडिओत दिसत आहे. आता इंग्लंड क्रिकेट बोर्ड उपद्रवी प्रेक्षकांवर कारवाई करते की नाही? याकडे लक्ष लागून आहे. या प्रकाराबद्दल भारतीय संघाने पंच मायकल गोफ आणि रिचर्ड इलिंगवर्थ यांच्याकडे तक्रार केली आहे.

इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात भारताचा आघाडीचा फलंदाज केएल राहुलनं शतकी खेळी केली. केएल राहुलचं कसोटी कारकिर्दीतलं सहावं शतक आहे. केएल राहुलनं मैदानात तग धरत इंग्लंडच्या गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला. त्याने २१२ चेंडू खेळत शतक ठोकलं. शतकी खेळी करत त्याने विरोधकांची तोंडं बंद केली आहेत. दोन वर्षे कसोटी क्रिकेटपासून दूर असणाऱ्या केएल राहुलनं आपल्या कारकिर्दीतलं सहावं शतक ठोकलं. त्याने ३ वर्षानंतर कसोटीत शतक झळकावलं आहे. यापूर्वी २०१८ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर असताने त्याने शतकी खेळी केली होती. ओवल मैदानात त्याने १४९ धावांची खेळी केली होती.