भारत-इंग्लंड क्रिकेट मालिका

जागतिक क्रमवारीत आघाडीच्या दोन संघांत समावेश असलेल्या भारत-इंग्लंड यांच्यातील ट्वेन्टी-२० मालिका अपेक्षेप्रमाणे उत्कंठावर्धक तसेच चाहत्यांचे मनोरंजन करणारी ठरली. पाच सामन्यांची ही मालिका आता २-२ अशा बरोबरीवर असल्याने शनिवारी होणाऱ्या निर्णायक लढतीत यश संपादन करून कोणता संघ मालिकेवरही कब्जा करणार, हे पाहणे रंजक ठरेल.

नाणेफेकीचे महत्त्व कमी करून दमदार कामगिरीच्या बळावर पिछाडीवर असलेल्या भारताने चौथ्या सामन्यात इंग्लंडवर आठ धावांनी सरशी साधली. सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर हे मुंबईकर भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले. कर्णधार विराट कोहलीनेसुद्धा संघाच्या जिगरबाज वृत्तीचे कौतुक करत युवा खेळाडूंची पाठ थोपटली. त्यामुळे आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी संघाचे स्वरूप कसे असावे, याची पुरेशी कल्पना या मालिकेद्वारे कोहलीसह प्रशिक्षक रवी शास्त्री यांना नक्कीच मिळाली असेल.

राहुलला आणखी एक संधी

गेल्या चार सामन्यांत सलामीवीर के. एल. राहुलने अनुक्रमे १, ०, ०, १४ अशा धावा केल्या आहेत. परंतु शिखर धवन आणि इशान किशन यांच्या तुलनेत राहुललाच संघ व्यवस्थापनाची अधिक पसंती असल्याने तो पाचव्या सामन्यातही रोहित शर्मासह सलामीला खेळण्याची दाट शक्यता आहे. एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात निवड झालेल्या सूर्यकुमारसह, कोहली, श्रेयस, पंत यांच्यावर मधल्या फळीची जबाबदारी असेल.

पाच गोलंदाजांचीच रणनीती

अष्टपैलू हार्दिक पंड्या पाचव्या गोलंदाजाची भूमिका योग्यपणे बजावत असल्यामुळे भारत पाचव्या लढतीतसुद्धा पाच गोलंदाजांचीच रणनीती कायम राखण्याची शक्यता आहे.

इंग्लंडला मधल्या फळीकडून अपेक्षा

पराभूत झालेल्या दोन्ही सामन्यांत इंग्लंडच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी निराशा केली. जोस बटलर आणि जेसन रॉय हे दोघेही स्वस्तात माघारी परतल्यावर आठव्या क्रमांकापर्यंत लांबलेली फलंदाजांची फळी अपेक्षेनुसार कामगिरी करण्यात अपयशी ठरत आहे. त्यामुळे कर्णधार इऑन मॉर्गनसह, डेव्हिड मलान, जॉनी बेअरस्टो यांना जबाबदारीने खेळण्याची गरज आहे.

इंग्लंड संघाला दंड

चौथ्या ट्वेन्टी-२० लढतीत षटकांची गती न राखल्याबद्दल इंग्लंड संघातील खेळाडूंच्या सामन्याच्या मानधनातील २० टक्के रक्कम कापण्यात आली. निर्धारित वेळेत इंग्लंडने एक षटक कमी टाकले.

संघ

*  भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, राहुल तेवतिया, यजुर्वेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, शार्दूल ठाकूर, नवदीप सैनी, थंगरासू नटराजन.

*  इंग्लंड : ईऑन मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर, लिआम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, बेन स्टोक्स, मोईन अली, सॅम बिलिंग्स, आदिल रशीद, रीस टॉप्ली, ख्रिस जॉर्डन, सॅम करन, टॉम करन, जोफ्रा आर्चर, मार्क वूड.

* वेळ : सायंकाळी ७ वा.

*  थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी (संबंधित एचडी वाहिन्यांवर)