पहिल्या सामन्यात विजयाने दिलेली हुलकावणी आणि दुसऱ्या लढतीत न्यूझीलंडकडून झालेला पराभव, यामुळे भारतीय पुरुष हॉकी संघाचे मनोबल खचले असल्याचे म्हटले जात आहे. पण हा मनाचा दुबळेपणा झटकून टाकून भारतीय संघ स्पर्धेतील पहिल्या विजयासाठी जीवाचे रान करेल. अझलन शाह चषक हॉकी स्पध्रेत भारतीय संघाला बुधवारी यजमान मलेशियाच्या कडव्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे.
प्रशिक्षक पॉल व्ॉन अ‍ॅस यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा हा संघ अद्यापही पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे. पहिल्याच लढतीत भारताने बलाढय़ कोरियाला २-२ असे बरोबरीत रोखले होते, परंतु दुसऱ्या लढतीत त्यांच्या खेळातील उणिवा प्रकर्षांने जाणवल्या आणि न्यूझीलंडने २-१ असा विजय साजरा केला.
स्पर्धेत आतापर्यंत मलेशियालाही विजयाचे खाते उघडण्यात अपयश आले असले, तरी त्यांनी विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला गत लढतीत विजयासाठी कडवी टक्कर दिली. मलेशियाला २-३ अशा फरकाने पराभव पत्करावा लागला. त्यामुळे जागतिक क्रमवारीत भारताच्या (९) तीन स्थानांनी खाली असलेल्या मलेशियाने चमत्कार केल्यास नवल वाटायला नको. त्यात मलेशियाला घरच्या प्रेक्षकांचा पाठिंबा असल्याने भारतावरील दडपण आणखी वाढले आहे.

भारताचे कच्चे दुवे..
’दोन्ही लढतींत भारतीय खेळाडूंनी चेंडूवर ताबा मिळवण्यात आघाडी घेतली, परंतु  गोलमध्ये रूपांतर करण्यात अपयश आले.
’भारताला गोल करण्याच्या अनेक संधी मिळाल्या. मात्र हुकमी एक्का आक्रमणपटू रमणदीप सिंग याला गोलमध्ये रूपांतर करता आले नाही.  
’आक्रमणपटू मनदीप सिंग याला कोरियाविरुद्धच्या लढतीत घोटय़ाच्या दुखापतीमुळे बाहेर बसावे लागले होते आणि त्यातून सावरण्यासाठी त्याला आणखी काही दिवस लागतील.
’ पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर करण्यात भारतीय संघाला अपयश आले आहे.