श्रीलंकेविरुद्ध आज निर्णायक एकदिवसीय सामना; प्रदीपच्या जागी चामिराचा समावेश होण्याची शक्यता

पहिल्या सामन्यातील मानहानीकारक पराभवातून सावरल्यानंतर दुसऱ्या सामन्यात रोहित शर्माच्या द्विशतकी पराक्रमासह साकारलेल्या दिमाखदार विजयामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळेच रविवारी होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात विशाखापट्टणम्च्या बालेकिल्ल्यावर भारताचे पारडे जड मानले जात आहे.

ऑक्टोबर २०१५मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत पराभव पत्करल्यानंतर भारताने मायदेशात एकही मालिका गमावलेली नाही. श्रीलंकेचा संघ मात्र भारताविरुद्ध पहिलीवहिली एकदिवसीय मालिका जिंकण्यासाठी उत्सुक आहे. त्यांनी भारतामध्ये आठ मालिका गमावल्या आहेत, तर एक मालिका बरोबरीत सोडवण्यात यश मिळवले आहे.

धरमशाला येथे वेगवान गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टीवर भारताने सपाटून मार खाल्ल्यानंतर मोहालीमधील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहितने आपल्या एकदिवसीय कारकीर्दीतील तिसरे द्विशतक साकारले आणि संघाला मोठा विजय मिळवून दिला. विशाखापट्टणम्च्या मैदानावर भारतीय संघ ७ सामने खेळला असून, यापैकी एकदाच सामना गमावला आहे, तर एक सामना पावसामुळे अपूर्ण राहिला. भारतीय संघ या मैदानावरील अखेरचा सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. त्या सामन्यात भारताने शानदार विजय मिळवला होता.

धरमशालामधील पराभवामुळे भारत आता दक्षिण आफ्रिकेचे आयसीसी एकदिवसीय क्रमवारीतील अव्वल स्थान हिसकावून घेणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. मात्र तरीही मालिका विजय हा भारतासाठी महत्त्वाचा असणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली कसोटी मालिका जिंकल्यानंतर एकदिवसीय क्रिकेटमध्येही श्रीलंकेवर वर्चस्व प्रस्थापित करण्याची जबाबदारी रोहितच्या खांद्यावर असेल.

धरमशाला येथे निराशाजनक कामगिरी करीत फक्त ११२ धावांवर हाराकिरी पत्करणाऱ्या भारतीय फलंदाजांनी मोहालीत ४ बाद ३९२ धावांचा डोंगर उभारला. अन्य फलंदाजांनीही त्याचा कित्ता गिरवला. शिखर धवनने आक्रमक अर्धशतकी खेळी साकारली, तर नवख्या श्रेयस अय्यरने आपल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ८८ धावांची धडाकेबाजी खेळी केली. त्यामुळे भारतीय फलंदाजांना आपल्या दर्जाला साजेसा सूर गवसला असल्याची ग्वाही मिळत आहे.

तिसऱ्या सामन्यातही वर्चस्व गाजवायचे असेल तर आघाडीच्या फळीची कामगिरी भारतासाठी महत्त्वाची ठरेल. मग मधल्या फळीत दिनेश कार्तिक, मनीष पांडे, महेंद्रसिंग धोनी आणि हार्दिक पंडय़ा यांच्यावर धावसंख्या वाढवण्याचे आव्हान असेल. पांडे किंवा कार्तिक यांच्यापैकी एकाला विश्रांती दिली, तरच अजिंक्य रहाणेला संघात स्थान मिळू शकेल.

फलंदाजांना अनुकूल खेळपट्टय़ांवर धावांचे विक्रम घडत आहेत. त्यामुळे पहिली १० षटके दोन्ही संघांसाठी महत्त्वाची ठरत आहेत. भारताची धुरा भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांच्यावर, तर श्रीलंकेची सुरंगा लकमलवर असेल.

श्रीलंकेसाठी सरते संपूर्ण वर्ष हे झगडणारे ठरले होते. आता भारताविरुद्धच्या निर्णायक लढतीसाठी अष्टपैलू खेळाडू अँजेलो मॅथ्यूज उपलब्ध असणे, ही लंकेसाठी जमेची बाब ठरेल. मोहालीच्या पराभवात मॅथ्यूजचे शतक झाकोळून गेले. श्रीलंकेच्या फलंदाजीच्या फळीत उपुल थरंगा हा सर्वाधिक अनुभवी फलंदाज आहे. मात्र संघासाठी त्याच्याकडून मोठय़ा योगदानाची अपेक्षा आहे. लाहिरू थिरिमाने, दनुष्का गुणतिलका आणि निरोशान डिक्वेला यांच्या फलंदाजीत सातत्याचा अभाव जाणवत आहे. त्यांनीसुद्धा जबाबदारीने फलंदाजी केल्यास धरमशालाची पुनरावृत्ती विशाखापट्टणम्ला होऊ शकेल. श्रीलंकेच्या गोलंदाजांनाही रोहितच्या आक्रमणातून सावरण्याची नितांत आवश्यकता आहे. न्यूवान प्रदीप मोहालीत सर्वात महागडा ठरला होता. त्याच्या १० षटकांत भारतीय फलंदाजांनी १०६ धावा केल्या होत्या.

एकदिवसीय मालिकेमध्ये दोन्ही संघांच्या फिरकी गोलंदाजांना अपेक्षित यश मिळालेले नाही. तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ बदल करणार नाही, मात्र श्रीलंकेच्या संघात प्रदीपच्या जागी वेगवान गोलंदाज दुष्मंता चामिराचा समावेशाची शक्यता आहे.

संघ

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, मनीष पांडे, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), हार्दिक पंडय़ा, एसएस वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, अजिंक्य रहाणे, अक्षर पटेल, सिद्धार्थ कौल.

श्रीलंका : थिसारा परेरा (कर्णधार), उपुल थरंगा, दनुष्का गुणतिलका, लाहिरु थिरिमाने, असीला गुणरत्ने, संदीरा समरविक्रमा, निरोशान डिक्वेला (यष्टीरक्षक), धनंजया डी’सिल्व्हा, अँजेलो मॅथ्यूज, सचिथ पथिराणा, सुरंगा लकमल, न्यूवान प्रदीप, अकिला धनंजया, चतुरंगा डी’सिल्व्हा, दुष्मंता चामिरा, कुशल परेरा.

सामन्याची वेळ : दु. १.३० वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स.