२०२४ सालच्या ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद भारताला मिळावे यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील आहे. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (आयओए) आणि केंद्र सरकारने संयुक्तरित्या यासाठीचे प्रयत्न देखील सुरू केले आहेत. तसेच दोन्ही बाजूंनी सकारात्मक प्रतिसाद देखील मिळाल्याची माहिती आयओएच्या सुत्रांनी दिली आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बॅश या महिन्यांच्या अखेरीस भारत दौ-यावर असून या दौ-यात बॅश मोदींची भेट घेणार आहेत. या भेटीत दोघांमध्ये ऑलिम्पिकच्या यजमानपदासाठी चर्चा होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. २०२४ मध्ये होणा-या ऑलिम्पिकचे यजमान पद मिळवण्यासाठी येत्या काही महिन्यांमध्ये बोली लावली जाणार आहे. जर्मनी आणि इटलीच्या पाठोपाठ भारतानेही ऑलिम्पिकच्या यजमानपदासाठी बोली लावण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. मोदींना यजमानपदासाठी बोली लावण्याची इच्छा आहे. बोली लावताना ५०० कोटी रुपयांचे हमी पत्र द्यावे लागते. त्यादृष्टीने मोदी व त्यांची टीम अभ्यास करत असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.