दुय्यम फळीपेक्षाही कमकुवत खेळाडूंचा समावेश असलेल्या भारताचा दक्षिण कोरियाविरुद्धच्या डेव्हिस चषक टेनिस लढतीत अपेक्षेप्रमाणे पराभव झाला. कोरियाने हा सामना ४-१ असा जिंकला. शेवटच्या दिवशी भारताने एकेरीचे दोन्ही सामने गमावले.
आर.के.खन्ना स्टेडियमवर झालेल्या या लढतीत कोरियाने पहिल्या दिवशी एकेरीचे दोन्ही सामने जिंकून २-० अशी आघाडी घेतली होती. दुहेरी लिएंडर पेस व पुरव राजा यांनी विजय मिळवीत ही आघाडी कमी केली होती आणि सामन्यातील रंगत कायम ठेवली होती मात्र व्ही.एम.रणजित व विजयंत मलिक या दोन्ही खेळाडूंना परतीच्या एकेरीत पराभव स्वीकारावा लागला. रणजित याला सुक यांग जिआंग याने ६-४, ६-४, ६-२ असे पराभूत केले. पाठोपाठ प्रथमच डेव्हिस चषक खेळणाऱ्या जिसुयांग नाम याने मलिक याच्यावर ६-२, ६-४ अशी मात केली.
सोमदेव देववर्मन याच्यासह भारताच्या अकरा अव्वल दर्जाच्या खेळाडूंनी विविध मागण्यांकरिता अखिल भारतीय टेनिस संघटनेशी झालेल्या मतभेदांमुळे कोरियाविरुद्धच्या लढतीवर बहिष्कार घातला होता. साहजिकच या लढतीकरिता भारतास पेस याच्या साथीत दुय्यम खेळाडूंवर भिस्त ठेवावी लागली होती. बंडखोर खेळाडूंपैकी सनमसिंग हा येथे सामने पाहण्यासाठी उपस्थित होता. मायदेशात यापूर्वी २००५ मध्ये भारताने याच मैदानावर स्वीडनविरुद्ध १-३ असा पराभव पत्करला होता. भारताचा आता प्लेऑफ गटाचा पहिला सामना ५ ते ७ एप्रिल दरम्यान इंडोनेशियाबरोबर भारतातच होणार आहे.
‘आम्ही विजयाची संधी गमावली’
घरच्या मैदानावर खेळत असूनही आम्ही त्याचा फायदा घेऊ शकलो नाही. त्यामुळेच हा सामना जिंकून पहिल्या फेरीत स्थान मिळविण्याची संधी आम्ही वाया घालविली असे मत भारताच्या प्रशिक्षकांबरोबरच खेळाडूंनीही व्यक्त केले. भारताचे न खेळणारे कर्णधार एस.पी.मिश्रा यांनी सांगितले, आमच्या खेळाडूंनी अपेक्षेइतका प्रभावशाली खेळ दाखविला नाही अन्यथा येथे विजय मिळविणे आम्हास शक्य होते. आमच्या खेळाडूंनी विनाकारण कोरियन खेळाडूंचे दडपण घेत खेळ केला आणि पराभव ओढवून घेतला. मात्र रणजित याने परतीच्या एकेरीत चांगली झुंज दिली. त्याला उज्ज्वल भवितव्य आहे. इंडोनेशियाविरुद्धच्या लढतीपूर्वी खेळाडू व संघटना यांच्यातील मतभेद संपुष्टात येतील अशी मला आशा आहे.