गुवाहाटी : कर्णधार सुनील छेत्री याने सुरुवातीलाच केलेल्या गोलनंतरही भारतीय फुटबॉल संघाला २०२२ फिफा विश्वचषक पात्रता फुटबॉल स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत ओमानकडून १-२ असे पराभूत व्हावे लागले.

३५ वर्षीय सुनील छेत्रीने २४व्या मिनिटालाच भारताला आघाडी मिळवून दिली होती. त्याचा हा ७२वा आंतरराष्ट्रीय गोल ठरला. मात्र रबिया सेद अल अलावी अल मंधार याने ८२व्या मिनिटाला भारताचा गोलरक्षक गुरप्रीत सिंह संधू याला चकवून पहिला गोल करत ओमानला १-१ अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर ८९व्या मिनिटाला मंधार याने दुसरा गोल करत ओमानला २-१ असा विजय मिळवून दिला.

जागतिक क्रमवारीत ८७व्या स्थानी असलेल्या ओमानने अधिक काळ चेंडूवर ताबा आणि सर्वाधिक गोल करण्याच्या संधी निर्माण केल्या तरी पहिल्या सत्रावर भारताचे वर्चस्व राहिले. डाव्या बाजूने प्रतिस्पध्र्याच्या गोलक्षेत्रात मजल मारताना अब्दुलझिझ अल घैलानी याने चूक केल्यामुळे भारताला फ्री-किक मिळाली. त्यावर छेत्रीने डाव्या पायाने मारलेला फटका थेट ओमानच्या गोलजाळ्यात गेला. पाहुण्यांनी दुसऱ्या सत्रात जोमाने पुनरागमन करत घरच्या मैदानावर विजय मिळवण्याचे भारताचे स्वप्न धूळीस मिळवले.