जागतिक हॉकी लीग स्पध्रेतील तणावपूर्ण प्ले-ऑफ सामन्यात रविवारी बलाढय़ स्पेनकडून पेनल्टीमध्ये पराभूत झाल्याने भारताला सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. निर्धारित वेळेत सामना २-२ असा बरोबरीत सुटल्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये भारताने २-४ अशा फरकाने हार पत्करली. मनदीप सिंग आणि आकाशदीप सिंग यांनी पेनल्टीच्या संधी वाया घालविल्यामुळे भारताच्या वाटय़ाला पराभव आला.
मनदीपचे गोल करण्याचे प्रयत्न स्पेनचा गोलरक्षक क्युको कोर्टीसने हाणून पाडल्यानंतर रॉक ऑलिव्हाने शेवटच्या पेनल्टीच्या संधीचे सोने करीत गोल केला आणि जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
निर्धारित वेळेत अॅलेक्स कासासायसच्या सोप्या पासवर गोल करीत करीत स्पेनने आपले खाते उघडले. त्यानंतर स्पेनच्या खेळाडूंनी भारताच्या बचावफळीवर जोरदार आक्रमण केले. त्यानंतर भारताने लागोपाठ दोन गोल झळकावत उत्कंठा निर्माण केली. व्ही. आर. रघुनाथच्या पासवर गोलपोस्टच्या उजवीकडून झेपावत शिवेंद्र सिंगने भारतासाठी पहिला गोल नोंदवला. मग संदीप सिंगच्या उजव्या दिशेकडून मिळालेल्या शक्तीशाली क्रॉसवर मनदीपने सुरेख नियंत्रण मिळवत पहिल्या सत्रात भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर खेळ कमालीचा वेगवान झाला. दोन्ही संघांकडून गोलपोस्टवर आक्रमणे झाली. पी. आर. श्रीजेश आणि क्युको कोर्टीस यांनी अनेक गोल वाचवले. दुसऱ्या सत्रातही रोमहर्षक खेळ झाला. परंतु स्पेनचा खेळ भारतापेक्षा सरस झाला. त्यांच्या वाटय़ाला चार कॉर्नर्स आले, परंतु त्यांना एकाचेही गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. ५६व्या मिनिटाला डेव्हड अलेग्रेने श्रीजेशला चकवत बॅकहँड फटक्याने गोल करीत स्पेनला बरोबरी साधून दिली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 24, 2013 7:55 am