भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बुधवारपासून सुरू झालेल्या ब्रिस्बेन कसोटीत मुरली विजयने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार शतक ठोकले. १८० चेंडूत १४ चौकारांसह त्याने आपल्या कारकिर्दीतील पाचवे शतक झळकावले. याशिवाय, अजिंक्य रहाणेनेही विजयला साथ देत आपले अर्धशतक गाठले. नॅथन लिऑनच्या फिरकीवर आक्रमक फटका मारण्याच्या नादात मुरली विजय बाद झाला आहे. मुरली विजय गाबा मैदानावर कसोटीच्या पहिल्या डावात सर्वाधिक धावसंख्या उभारणारा परदेशी खेळाडू ठरला.
पहिल्या दिवसाअखेर भारतीय संघाची धावसंख्या ४ बाद ३११ अशी समाधानकारक असून अजिंक्य रहाणे नाबाद ७५ तर, रोहित शर्माने नाबाद २६ धावा ठोकल्या आहेत. तत्पूर्वी सकाळच्या सत्रात भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सलामवीर शिखर धवन २५ धावा करून झटपट माघारी परतला. त्यानंतर, चेतेश्वर पुजारा आणि मुरली विजय सावध फलंदाजी करून भारताला दीडशतकी धावसंख्या गाठून देणार असे वाटत असतानाच पुजारा पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा बळी ठरला. त्यानंतर खेळपट्टीवर आलेला विराट कोहलीही १९ धावांवर झटपट बाद झाल्याने भारत पुन्हा एकदा बिकट अवस्थेत सापडणार का , असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, अजिंक्य रहाणेच्या साथीने विजयने नेटाने फलंदाजी करत भारताला २०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. तत्पूर्वी त्याने धवन, पुजारा आणि कोहली यांच्या साथीने संघासाठी उपयुक्त भागीदाऱ्या रचल्या.
स्कोअरकार्ड-