ऑस्ट्रेलियाचा २-१ असा विजय; परंतु गोलफरकाआधारे सरशी

तिरंगी कनिष्ठ महिला हॉकी स्पर्धा

भारताच्या कनिष्ठ महिला हॉकी संघाने अखेरच्या लढतीत पराभवानंतरही रविवारी तिरंगी हॉकी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. भारताच्या मुलींनी रविवारी चौथ्या लढतीत यजमान ऑस्ट्रेलिया संघाकडून १-२ असा पराभव पत्करला. मात्र गुणतालिकेत अव्वल स्थान असल्याने भारताच्या मुलींना अजिंक्यपद पटकावता आले.

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी चार सामन्यांतून प्रत्येकी सात गुण कमावले. परंतु गोलफरकाआधारे भारताने त्यांच्यावर बाजी मारली. न्यूझीलंडने चार सामन्यांतून अवघे तीन गुण मिळवल्याने त्यांना तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले.

ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅबिगेल विल्सनच्या दोन गोलमुळे भारताला अखेरच्या लढतीत पराभव पत्करावा लागला. विल्सनने १५ व्या मिनिटाला गोल करत यजमानांना आघाडी मिळवून दिली होती. मात्र गगनदीप कौरने ५३ व्या मिनिटाला दमदार गोल केल्याने भारताला १-१ बरोबरी साधता आली. मात्र नंतर अवघ्या तीन मिनिटांतच विल्सनने (५६ वे मिनिट) दुसरा गोल करत ऑस्ट्रेलियाचा विजयाचा मार्ग मोकळा केला.

पहिले सत्र हे भारताच्या महिला संघासाठी ऑस्ट्रेलियाच्या वर्चस्वामुळे खडतर गेले होते. १५ व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाला पेनल्टी कॉर्नरची संधी मिळाली. त्यावर विल्सनने संधीचे सोने केले. दुसऱ्या सत्रात भारताला २२ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरच्या संधीवर गोल करता आला नाही. चार मिनिटांनंतर लगेचच भारताला दुसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला. मात्र ऑस्ट्रेलियाची गोलरक्षक हॅना अ‍ॅस्टब्युरीने सूर मारत यजमानांसाठी गोल वाचवला. दोन मिनिटांनंतर लगेचच पेनल्टी स्ट्रोक सुवर्णसंधी ऑस्ट्रेलियासाठी होती. मात्र भारताची गोलरक्षक बिशू देवी खरिबामने गोल होऊ दिला नाही. तिसऱ्या सत्रातही उभय संघांना पेनल्टी कॉर्नरच्या संधी होत्या. मात्र उभय संघांच्या गोलरक्षकांच्या अप्रतिम कामगिरीमुळे गोल होऊ शकले नाहीत. चौथ्या सत्रात भारताच्या महिला खेळाडूंनी सुरुवातीपासून ऑस्ट्रेलियावर दडपण टाकायला सुरुवात केली. त्याची परिणती ५३ व्या मिनिटाला गगनदीपकडून पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यात झाली. मात्र या गोलनंतरही विल्सनने केलेल्या दुसऱ्या गोलमुळे भारत पराभव टाळू शकला नाही.