सांघिक कसोटी क्रमवारीत इंग्लंड चौथ्या स्थानावर

लंडन : इंग्लंडविरुद्धची मालिका गमावल्यानंतरही आयसीसी कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थान टिकवण्यात भारताने यश मिळवले आहे. मात्र पाच कसोटी सामन्यांची मालिका ४-१ अशी जिंकणाऱ्या इंग्लंडने चौथे स्थान प्राप्त केले आहे.

मालिकेआधी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारताच्या खात्यावर १२५ गुण होते, परंतु मालिका गमावल्यानंतर आता गुणसंख्या ११५ अशी झाली आहे. इंग्लंडने मंगळवारी पाचव्या आणि अखेरच्या कसोटीत ११८ धावांनी विजय मिळवला.

इंग्लंडचा संघ मालिका सुरू होण्यापूर्वी ९७ गुणांसह पाचव्या स्थानावर होता. मात्र अग्रस्थानावरील भारतावर मालिकाविजय मिळवल्याने त्यांच्या खात्यावर आणखी ८ गुणांची भर पडली. त्यामुळे एकूण गुणसंख्या १०५ झालेल्या इंग्लंडने न्यूझीलंडला (१०२ गुण) मागे टाकले. जो रूटच्या नेतृत्वाखालील इंग्लंडचा संघ दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया यांच्यापासून एका गुणाच्या अंतरावर आहे. या दोन्ही संघांच्या खात्यावर प्रत्येकी १०६ गुण जमा आहेत.

कोहली अव्वल स्थानावर

दुबई : आयसीसीच्या ताज्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान टिकवले आहे. भारताने १-४ अशा फरकाने गमावलेल्या कसोटी मालिकेत कोहलीने ५९.३च्या सरासरीने एकूण ५९३ धावा केल्या आहेत. मालिकेआधी कोहलीच्या खात्यावर २७ गुण होते आणि तो ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथच्या मागे होता. मात्र मालिकेनंतर आता तो स्मिथपेक्षा एका गुणाने आघाडीवर आहे.