मोहालीत दक्षिण आफ्रिकेला गुंडाळण्याची भारताची रणनीती
ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत हार पत्करल्यानंतर आता किमान कसोटी मालिकेवर मोहर उमटवण्याचे उद्दिष्ट भारतीय संघाने समोर ठेवले आहे. फिरकीला अनुकूल खेळपट्टय़ा बनवून कसोटी जिंकण्याचा इतिहास भारताच्या गाठीशी आहे. त्यामुळेच हे ‘फिरकी चक्रव्यूह’ भेदण्याचे आव्हान दक्षिण आफ्रिकेपुढे असेल.
मर्यादित षटकांच्या दोन्ही प्रकारांमध्ये भारताला घरच्या वातावरणाचा फायदा घेण्यात अपयश आले. दक्षिण आफ्रिकेने मात्र लक्षवेधी कामगिरी केली. आता शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या मोहालीतील पहिल्या कसोटीत भारतीय संघ वेगवान गोलंदाज इशांत शर्माशिवाय उतरणार आहे. श्रीलंकेतील कसोटी मालिकेत आक्रमक वृत्तीचे प्रदर्शन घडवणाऱ्या इशांतवर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे.
दक्षिण आफ्रिकेकडे दर्जेदार फलंदाजीची फळी आहे. तिला वेसण घालण्यासाठी भारताची फिरकी फळी सज्ज झाली आहे. रवींद्र जडेजाचे पुनरागमन झाल्यामुळे पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर कर्णधार विराट कोहली तीन फिरकी गोलंदाजांसह खेळेल.
अश्विनसह फिरकी त्रिकूट
भारताचा आघाडीचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन दुखापतीतून सावरला आहे. कानपूरच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात स्नायू दुखावल्यामुळे उर्वरित चार सामन्यांमध्ये तो खेळू शकला नव्हता. श्रीलंकेतील भारताच्या ऐतिहासिक कसोटी विजयात अश्विनचा सिंहाचा वाटा होता. त्याने त्या मालिकेत २० बळी घेण्याची किमया साधली होती. फॅफ डू प्लेसिस आणि डीन एल्गर यांनीही भारताच्या धोकादायक फिरकीचे आव्हान कबूल केले आहे.
कसोटीत भारताला आशादायी विजय मिळू शकेल, असे मत भारताचे संघ संचालक रवी शास्त्री यांनी नुकतेच व्यक्त केले. चालू रणजी हंगामात अमित मिश्रा आणि जडेजा यांनी आपले कर्तृत्व दाखवले आहे. त्यामुळे सौराष्ट्रकडून खेळणारा जडेजा बऱ्याच कालावधीनंतर संघात दिसत आहे. गेल्या वर्षी इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत खेळलेल्या जडेजाने चार रणजी सामन्यांत ३८ बळी घेत निवड समितीचे लक्ष वेधले आहे. डावखुरी फिरकी गोलंदाजी हे त्याचे वैशिष्टय़. सोबतीला मिश्राची लेग-स्पिन व अश्विनची ऑफ-स्पिन असे वैविध्य भारतीय संघात आहे.
धवनला दिलासा
फलंदाजीचे क्रम ठरवताना मात्र भारतीय संघ व्यवस्थानाची परीक्षा असेल. शिखर धवन, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा आणि रोहित शर्मा असे पर्याय भारतासमोर उपलब्ध आहेत. २०१३मध्ये धवनने मोहालीतील पर्दापणीय सामन्यात १८७ धावांची खेळी साकारली होती. ‘‘कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमधील फॉर्मची गल्लत करू नये. मागील दोन कसोटी सामन्यांत धवनने शतके झळकावली आहेत. त्यामुळे तो अतिशय फॉर्मात आहे,’’ असे मत शास्त्री यांनी व्यक्त करून धवनला दिलासा दिला आहे.
डी’व्हिलियर्सची दहशत
दक्षिण आफ्रिकेचा संघ संघनायक हशिम अमलाच्या फॉर्ममुळे चिंताग्रस्त आहे. कामचलाऊ फिरकी गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू जीन-पॉल डय़ुमिनी पहिल्या कसोटीला मुकणार हे स्पष्ट झाले आहे. तर मॉर्नी मॉर्केलच्या तंदुरुस्तीबाबतचे प्रश्नचिन्ह अद्याप कायम आहे. मात्र भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी ‘सुपरमॅन’ची उपमा दिलेल्या ए बी डी’व्हिलियर्सची दहशत भारतीय गोलंदाजांवर कायम आहे. डी’व्हिलियर्सच्याच सातत्यपूर्ण कामगिरीमुळे भारताने एकदिवसीय मालिका ३-२ अशी जिंकली. डीन एल्गर, स्टियान व्हान झिल आणि फॅफ डू प्लेसिस यांच्यावर आफ्रिकेच्या फलंदाजीची मदार आहे. तर डय़ुमिनीच्या जागी तेंबा बाव्हुमा संघात स्थान मिळवू शकेल.
ताहीरकडून अपेक्षा
दक्षिण आफ्रिकेच्या आक्रमणाची धुरा वेगवान गोलंदाज डेल स्टेन आणि मॉर्नी मॉर्केलच्या खांद्यावर असेल, तर फिरकीचे नेतृत्व इम्रान ताहीर करील. दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून दमदार कामगिरी बजावणाऱ्या ताहीरला भारतीय वातावरणाचा खेळण्याचा सराव आहे. अमलाच्या नेतृत्वाखालील आफ्रिकेचा संघ एका अतिरिक्त फिरकी गोलंदाजासह भारताचा सामना करेल. त्यांच्याकडे सिमॉन हार्पर आणि डेन पीट हे ऑफ-स्पिनर उपलब्ध आहेत.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत २९ कसोटी सामने झाले असून, यापैकी १३ सामने आफ्रिकेने, तर ७ सामने भारताने जिंकले आहेत.
ल्ल दक्षिण आफ्रिकेचा संघ याआधी २००९-१०मध्ये भारत दौऱ्यावर कसोटी मालिकेसाठी आला होता. ती मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली होती.
२०१३-१४मध्ये भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला होता. ती मालिका आफ्रिकेने १-० अशा फरकाने जिंकली होती.

खेळपट्टीचा अंदाज

पीसीएची खेळपट्टी २३ वर्षे जुनी आहे. त्यामुळे या खेळपट्टीवर काही दिवसांनी चेंडू संथगतीने येईल. पण या खेळपट्टीवर सामन्याचा निकाल मात्र नक्की लागू शकतो. ही खेळपट्टी ‘स्पोर्टिग’ असेल. त्यामुळे फलंदाजांबरोबर गोलंदाजांनाही या खेळपट्टीची साथ मिळेल.

संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, अमित मिश्रा, भुवनेश्वर कुमार, आर. अश्विन, उमेश यादव, लोकेश राहुल, स्टुअर्ट बिन्नी, वरुण आरोन.

दक्षिण आफ्रिका : हशिम अमला (कर्णधार), ए बी डी’व्हिलियर्स (उपकर्णधार), तेंबा बाव्हुमा, जीन-पॉल डय़ुमिनी, फॅफ डू प्लेसिस, डीन एल्गर, सिमॉन हार्मर, इम्रान ताहीर, मॉर्नी मॉर्केल, व्हर्नन फिलँडर, डेन पीट, कॅगिसो रबाडा, डेल स्टेन, स्टियान व्हान झिल, डेन व्हिलास (यष्टीरक्षक).

सामन्याची वेळ :
सकाळी ९.३० वाजल्यापासून.
थेट प्रक्षेपण :
स्टार स्पोर्ट्स १, ३ आणि
स्टार स्पोर्ट्स एचडी १,३.