तिसऱ्या कसोटीसह मालिका वाचवण्यासाठी भारतीय संघात बदल अनिवार्य

नॉटिंगहॅम : पहिल्या दोन कसोटी सामन्यांत सपशेल शरणागती पत्करल्यानंतर आता तिसऱ्या कसोटीसह मालिका वाचवण्यासाठी भारताची अस्तित्वाची लढाई शनिवारपासून सुरू होईल. मात्र अपयशाची मालिका खंडित करून यशाकडे वाटचाल करण्यासाठी भारतीय संघात महत्त्वाचे बदल अपेक्षित आहे.

एजबॅस्टनची पहिली कसोटी ३१ धावांनी गमावल्यानंतर लॉर्ड्सच्या दुसऱ्या कसोटीत इंग्लंडने एक डाव आणि १५९ धावांनी वर्चस्व गाजवले. आता मालिका वाचवण्याची अखेरची संधी ट्रेंट ब्रीज कसोटीत भारताला असेल. इंग्लंडमध्ये साडेपाच दिवसांच्या स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये भारतीय संघ ०-२ असा पिछाडीवर पडला आहे.

पुन्हा संघरचनेत बदल

लॉर्ड्सवर मानहानीकारक पराभवानंतर आता कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री योग्य संघरचनेचा गांभीर्याने विचार करीत आहेत. कर्णधार कोहलीच्या नेतृत्वाखालील ३८व्या सामन्यात तितक्याच वेळा नवी संघरचना केली जाणार आहे. लॉर्ड्सवर स्विंग गोलंदाजीला अनुकूल खेळपट्टीवर दोन फिरकी गोलंदाजांना स्थान दिल्याबद्दल जोरदार टीका झाली होती. परंतु कोहलीने सामन्यानंतर संघनिवड चुकल्याचे कबूल केले होते.

यष्टीरक्षणाची जबाबदारी पंतकडे

दिनेश कार्तिकचे यष्टीरक्षण आणि फलंदाजीच्या मर्यादा पहिल्या दोन कसोटी सामन्यांतच स्पष्ट झाल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर २० वर्षीय ऋषभ पंतला पदार्पणाची संधी मिळणार, हे निश्चित मानले जात आहे. कार्तिकने पहिल्या दोन सामन्यांत अनुक्रमे ०, २० आणि १, ० धावा काढल्या. याशिवाय काही महत्त्वाचे झेलसुद्धा सोडले. शुक्रवारी पंतने फलंदाजी आणि यष्टीरक्षणाचा कसून सराव केला. ‘महेंद्रसिंग धोनीचा वारसदार’ असे बिरुद मिरवणाऱ्या पंतने इंग्लंड लायन्सविरुद्धच्या दोन प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये तीन अर्धशतके झळकावली होती. रुडकीमध्ये जन्मलेल्या पंतच्या खात्यावर प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ५४ धावांच्या सरासरीसह एक त्रिशतक जमा आहे. मात्र पहिल्याच कसोटीत त्याला इंग्लिश भूमीवर जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, ख्रिस वोक्स आणि सॅम करन यांच्यासारख्या वेगवान गोलंदाजांचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे यष्टीरक्षणासह पंतच्या फलंदाजीचीसुद्धा ही ‘कसोटी’ ठरणार आहे.

सलामीचा पेच कायम

भारताची आघाडीची फळी दोन्ही सामन्यांत अपयशी ठरली. मुरली विजय, शिखर धवन आणि लोकेश राहुल हे अपेक्षित सलामी देऊ शकले नाहीत. भारतीय संघ तिसऱ्या कसोटीसाठी धवन-राहुल हा तिसरा सलामीचा पर्याय हाताळू शकते. मुरली विजयने दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमधील १० परदेशी कसोटी सामन्यांत एकूण १२८ धावा केल्या आहेत. फक्त १२.८ धाव सरासरीकडे दुर्लक्षण करणे कठीण आहे. मात्र कसोटी क्रिकेटसाठी अनुरूप फलंदाज हे वैशिष्टय़ जोपासणाऱ्या मुरलीला आणखी एक संधी मिळू शकते. चालू वर्षांतील दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांमधील शिखर धवनची सरासरी १७.७५ आहे, इंग्लंडमधील चार कसोटी सामन्यांमधील त्याची एकंदर सरासरी २०.१२ अशी आहे. त्यामुळे धवनला पुन्हा संघात स्थान मिळू शकते.

कोहलीच्या दुखापतीची चिंता

कोहलीच्या दुखापतीची प्रमुख चिंता भारतीय संघाला भेडसावत आहे. लॉर्ड्स कसोटीत कोहलीच्या पाठीला दुखापत झाली होती. मात्र तो दुखापतीतून बऱ्यापैकी सावरत असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या मधल्या फळीत कोणताही बदल होण्याची शक्यता नाही.

बुमराहमुळे गोलंदाजी मजबूत

जसप्रीत बुमराह दुखापतीमधून सावरत तंदुरुस्त झाल्यामुळे भारताच्या वेगवान माऱ्याला दिलासा मिळाला आहे. रविचंद्रन अश्विन आणि हार्दिक पंडय़ा हाताला झालेल्या दुखापतीतून पूर्णत: सावरले आहेत. त्यामुळे उमेश यादवला संघात स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे.