भारतामध्ये इंडियन सुपर लीगची (आयएसएल) झोकात सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर भारताला १७ वर्षांखालील विश्वचषकाचे यजमानपद मिळाले आहे. देशात फुटबॉलला चालना देण्यासाठी फिफा क्लब विश्वचषकाचे यजमानपद भारताला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (एआयएफएफ) प्रतिष्ठेच्या २०-वर्षांखालील फिफा विश्वचषकाचे यजमानपद मिळवण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले जात आहे.
‘‘क्लब विश्वचषकासाठी फिफाच्या कार्यकारी समितीची बैठक डिसेंबरमध्ये मोरक्को येथे होणार आहे. यामध्ये २०१५-१६ आणि २०१७-१८ या वर्षांमध्ये होणाऱ्या क्लब विश्वचषकाच्या यजमानपदाचा निर्णय घेण्यात येणार आहे,’’ असे फिफाचे महासचिव जेरोम व्हॅल्के यांनी सांगितले.
एआयएफएफचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले की, ‘‘२०१७-१८च्या क्लब विश्वचषकाचे यजमानपद मिळवण्यासाठी आम्ही ठोस पावले उचलली आहेत. त्याचबरोबर २०-वर्षांखालील विश्वचषकाचे यजमानपद मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.’’