भारतीय पुरुष संघाने आशिया चषक बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकाविले. त्यांनी शेवटच्या लढतीत व्हिएतनाम संघावर ३-१ अशी मात केली. विजेतेपदाचे दावेदार असलेल्या चीन संघास दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
भारतीय संघाने या स्पर्धेत सतरा गुणांची कमाई केली. जागतिक व ऑलिम्पिक विजेत्या चीन संघास पंधरा गुण मिळाले. त्यांनी शेवटच्या लढतीत संयुक्त अरब अमिराती संघाचा ४-० असा दणदणीत पराभव केला. कझाकिस्तान व इराण यांना अनुक्रमे तिसरे व चौथे स्थान मिळाले.
व्हिएतनामविरुद्धच्या लढतीत भारताच्या ग्रँडमास्टर एस. पी. सेतुरामन व के. शशिकिरण यांनी विजय मिळविला. त्यांचे सहकारी ग्रँडमास्टर बी. अधिबन व विदित गुजराथी यांनी आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंविरुद्धचे डाव बरोबरीत सोडविले. भारताने तिसऱ्यांदा या स्पर्धेत अजिंक्यपद पटकाविले आहे. यापूर्वी त्यांनी
२००५ व २००९ मध्ये हा मान मिळविला होता. या दोन्ही वेळी चीन संघाने भाग घेतला नव्हता. त्यामुळेच यंदा चीनचा सहभाग असूनही भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी करीत त्यांनाही मागे टाकले.
महिलांमध्ये अग्रमानांकित चीन संघाने १५ गुणांसह अजिंक्यपदावर मोहोर नोंदविली. उजबेकिस्तान व कझाकिस्तान यांना अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळाला. भारतीय संघाने बारा गुणांसह चौथे स्थान घेतले. शेवटच्या फेरीत त्यांनी इराणविरुद्ध बरोबरी स्वीकारली.