टिंटू लुका, भारतीय धावपटू
पुढील वर्षी रिओ येथे होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताचा तिरंगा फडकावण्याचे माझे ध्येय आहे आणि हे लक्ष्य गाठण्यासाठी मी अहोरात्र कष्ट करीत आहे. ऑलिम्पिक पदक मिळवून माझ्या प्रशिक्षक पी. टी. उषा यांना अनोखी गुरुदक्षिणा देण्याचा मला आत्मविश्वास आहे, असे केरळची धावपटू टिंटू लुकाने सांगितले. तिने चीनमध्ये नुकत्याच झालेल्या आशियाई मैदानी स्पर्धेत ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. आंतरराष्ट्रीय स्तरावर वैयक्तिक क्रीडा प्रकारात तिचे हे पहिलेच विजेतेपद आहे. ऑलिम्पिक तयारीविषयी टिंटूने केलेली खास बातचीत –
*  आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदकाची खात्री होती का?
होय, विजेतेपदाची खात्री होती. कारण हे यश मिळवण्यासाठी खूप कसोशीने सराव केला होता. आशियाई स्तरावर प्रामुख्याने चीन व जपानच्या खेळाडूंचे मला आव्हान आहे, हे मी ओळखले होते. पी. टी. उषा यांच्या अकादमीत मी अनेक महिने माझ्या प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या शैलीचा अभ्यास केला होता. परदेशी खेळाडू कशी सुरुवात करतात व केव्हा वेग वाढवतात, याचे मी बारकाईने निरीक्षण केले होते. त्याचा फायदा मला शर्यतीच्या वेळी झाला. प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या शैलीनुसार मी शर्यतीत धावले. पहिल्या ४०० मीटर टप्प्यात मी सातत्यपूर्ण वेग ठेवला. त्यानंतर मी हळूहळू वेग वाढवला. शेवटच्या ५० मीटरमध्ये मी सर्वोत्तम धाव घेतली व विजेतेपद मिळवले.
*  एरवी तू दोन मिनिटांपेक्षा कमी वेळ नोंदवते. चीनमध्ये मात्र तुला ही वेळ नोंदवता का आली नाही?
या शर्यतीच्या वेळी खूप पाऊस सुरू होता. मला शर्यतीच्या वेळी वॉर्म अपदेखील करता आला नव्हता. प्रतिकूल स्थितीत ही शर्यत जिंकली, हीच माझ्यासाठी खूप महत्त्वाची कामगिरी आहे. अर्थात त्या वेळी दोन मिनिटे १० सेकंद ही ऑलिम्पिक पात्रता पूर्ण करता आली नाही, याचे दु:ख मला वाटत आहे. आता ही पात्रता वेळ मी आगामी जागतिक स्पर्धेत पार करीन अशी मला खात्री आहे. आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदकामुळे जागतिक स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यासाठी माझा आत्मविश्वास उंचावला आहे. तेथे पदक मिळविण्यासाठी मला खूप खडतर आव्हानाला सामोरे जावे लागणार असले तरी त्यासाठी माझी शारीरिक व मानसिक तयारी झाली आहे.
*   जागतिक मैदानी स्पर्धा व ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धासाठी परदेशात प्रशिक्षण घेणार आहे काय?
या दोन्ही स्पर्धा माझ्यासाठी खूप प्रतिष्ठेच्या आहेत. या दोन्ही स्पर्धामध्ये पदक मिळवण्याकरिता उषा दीर्घकालीन सरावाचे नियोजन केले आहे. या दोन्ही स्पर्धामध्ये प्रामुख्याने जमैका व अमेरिकन देशांचे माझ्यापुढे आव्हान असणार आहे. युरोपातील काही आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये मी भाग घेणार आहे. तेथे जमैका व अन्य तुल्यबळ स्पर्धकांबरोबर शर्यत करण्याची संधी मला मिळणार आहे. त्यामुळे माझ्या अनुभवात समृद्धता होईल. युरोपात काही दिवस प्रशिक्षण सराव शिबिरातही भाग घेण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. स्पर्धात्मक
सराव व प्रशिक्षण शिबिरातील अनुभवाद्वारे मला अद्ययावत तंत्राचे ज्ञान मिळविता
येईल.
*  ऑलिम्पिकमध्ये ८०० मीटर व रिले शर्यतीखेरीज अन्य काही शर्यतींमध्ये भाग घेणार आहे का?
मुळीच नाही. ८०० मीटर शर्यत व ४ बाय ४०० मीटर अंतराची रिले या दोन क्रीडा प्रकारांवरच मी लक्ष देणार आहे. जेवढय़ा कमी क्रीडा प्रकारांत सहभाग असेल, तेवढे अधिक चांगल्या रीतीने माझ्या शर्यतींवर लक्ष केंद्रित करणे सोयीचे होईल. रिओ ऑलिम्पिकनंतर कदाचित ४०० मीटर किंवा १५०० मीटर शर्यतींमध्ये भाग घेण्याचा माझा मनोदय आहे. सध्या फक्त ८०० मीटर अंतराच्या शर्यतींमध्ये ऑलिम्पिक पदक, हेच माझे अंतिम ध्येय आहे व ते लक्ष्य मी साध्य करीनच.
मिलिंद ढमढेरे, पुणे