पीटीआय, दोहा

विश्वचषक आणि आशिया चषक संयुक्त पात्रता फुटबॉल स्पध्रेत सोमवारी होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताला विजयाची नितांत आवश्यकता आहे. अन्यथा विजयापासून वंचित राहिलेल्या भारतीय संघाला आशिया चषक पात्रता स्पध्रेची तिसरी फेरी गाठण्यासाठी आणखी एका टप्प्याचा अडथळा पार करावा लागेल.

जागतिक फुटबॉल क्रमवारीत भारतीय संघ १०५व्या क्रमांकावर आहे, तर बांगलादेश १८४व्या क्रमांकावर आहे. विश्वचषक पात्रता स्पध्रेत भारताने बांगलादेशला दोनदा धूळ चारली आहे. त्यामुळे भारताचे पारडे जड मानले जात आहे.

विश्वचषक पात्रता शर्यतीतून भारताचे आव्हान आधीच संपुष्टात आले आहे, मात्र २०२३च्या आशिया चषक फुटबॉल स्पध्रेसाठी आशा जिवंत आहेत. सहा सामन्यांतून तीन गुण मिळवणारा भारतीय संघ ई-गटात चौथ्या स्थानावर आहे. बांगलादेशला हरवल्यास विश्वचषक पात्रता स्पध्रेतील गेल्या सहा वर्षांमधील भारताचा पहिला विजय ठरेल. याआधी २०१५मध्ये भारताने गुआमला १-० असे हरले होते.

’ सामन्याची वेळ : सायं. ७.३० वा.

’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २, ३, १ हिंदी

विश्वचषक पात्रता फुटबॉल स्पर्धा