वेटलिफ्टिंगमध्ये प्रत्येक गटासह स्नॅच, क्लिन व जर्क अशा तीन प्रकारांत सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके मिळविण्याची संधी असते. असे असूनही आजपर्यंत भारताला आशियाई क्रीडा स्पर्धेत एकही सुवर्णपदक मिळविता आलेले नाही. या स्पर्धाच्या प्रारंभापासूनच पुरुषांच्या गटाची वेटलिफ्टिंग स्पर्धा सुरू करण्यात आली. महिलांच्या स्पर्धाना १९९० पासून सुरुवात झाली.
आजपर्यंत भारताने या स्पर्धेत पाच रौप्य व नऊ कांस्य अशी एकूण चौदा पदकांची कमाई केली आहे. १९५१मध्ये पहिल्या स्पर्धेत भारताने एक रौप्य व एक कांस्यपदक मिळविले होते. त्यानंतर भारताला पदक मिळविण्यासाठी १९८२पर्यंत वाट पाहावी लागली. १९८२मध्ये भारताने घरच्या मैदानावर दोन कांस्यपदके मिळविली. १९९०मध्ये भारताने दोन रौप्य व दोन कांस्यपदके मिळविली, ही आजपर्यंतची भारताची सर्वोत्तम कामगिरी आहे. चीनने १९७४पर्यंत आशियाई क्रीडा स्पर्धेत एकदाही भाग घेतला नव्हता. तोपर्यंत झालेल्या स्पर्धामध्ये वेटलिफ्टिंग या क्रीडाप्रकारात इराणच्या खेळाडूंचे प्राबल्य होते. १९७४ नंतर चीनने आजपर्यंत वेटलिफ्टिंगमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजविले आहे. त्यांनी ७४ सुवर्ण, ३० रौप्य व १० कांस्य अशी एकूण ११४ पदके जिंकली आहेत. दक्षिण कोरियाने त्याखालोखाल स्थान घेताना ३१ सुवर्ण, २५ रौप्य व २८ कांस्यपदके मिळविली आहेत. इराणने ३० सुवर्ण, २८ रौप्य व १९ कांस्यपदकांची कमाई केली आहे. त्याखालोखाल जपान व कझाकिस्तान यांनी यश मिळविले आहे.
सुकेन, सतीशकुमार, संजिता यांच्यावर भारताची भिस्त
ग्लासगो येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने घवघवीत यश मिळविले होते. सुकेन डे, सतीशकुमार शिवलिंगम व संजिता चानू यांनी आपापल्या वजनी गटात सोनेरी कामगिरी केली होती. त्यांच्यावर भारताची मुख्य भिस्त आहे. त्यांच्याबरोबरच रौप्यपदक मिळविणारे रविकुमार काटुलू, विकास ठाकूर व मीराबाई चानू सैकोम, कांस्यपदक मिळविणारी पूनम यादव यांनी राष्ट्रकुल स्पर्धेतील कामगिरीची पुनरावृत्ती करावी अशीच भारतीय संघटकांची त्यांच्याकडून अपेक्षा आहे. भारतापुढे प्रामुख्याने चीन, इराण, कोरिया, जपान व थायलंड या देशांच्या खेळाडूंचे आव्हान असणार आहे. राष्ट्रकुल स्पर्धेपेक्षाही आशियाई स्पर्धेतील आव्हान अधिक कठीण मानले जाते. त्यामुळे आशियाई स्पर्धेत अव्वल कामगिरीसाठी भारतीय खेळाडूंना खूपच झगडावे लागणार आहे. स्पर्धेतील सहभागापेक्षाही त्यानंतर सामोरे जाणाऱ्या उत्तेजक औषधे सेवन प्रकरणांमुळेच भारतीय वेटलिफ्िंटग क्षेत्र सतत चर्चेत राहिले आहे. अर्थात, गेल्या तीन-चार वर्षांमध्ये या खेळाबाबत सकारात्मक बदल दिसून येऊ लागले आहेत. त्याचा फायदा घेत भारतीय खेळाडू कशी चांगली कामगिरी करतात हीच आशियाई स्पर्धेबाबत उत्सुकता आहे.
भारतीय संघ-
पुरुष-सुकेन डे (५६ किलो), रुस्तुम सारंग (६२ किलो), रविकुमार काटुलू, सतीशकुमार शिवलिंगम (७७ किलो), विकास ठाकूर (८२ किलो). महिला-संजिता चानू, मीराबाई चानू सैकोम (४८ किलो), पूनम यादव (६३ किलो), वंदना गुप्ता (६९ किलो), कविता देवी (७५ किलो).