भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर

दुखापतीतून सावरलेला डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टचे भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडच्या संघात पुनरागमन झाले आहे. २१ फेब्रुवारीपासून उभय संघांत सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी कायले जेमिसन आणि एजाझ पटेल यांनाही यजमानांच्या संघात स्थान लाभले आहे. परंतु अनुभवी फिरकीपटू मिचेल सँटनरला या संघातून वगळण्यात आल्याने क्रीडाप्रेमींमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने सोमवारी १३ खेळाडूंचा संघ जाहीर करताना बोल्टच्या पुनरागमनावर शिक्कामोर्तब केले. ३० वर्षीय बोल्ट उजव्या हाताला झालेल्या दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय मालिकेला मुकला होता. डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ‘बॉक्सिंग डे’ कसोटीदरम्यान बोल्टला दुखापत झाली होती. मात्र आता बोल्ट या दुखापतीतून पूर्णपणे सावरला असून त्याच्या समावेशामुळे न्यूझीलंडची गोलंदाजांची फळी अधिक सक्षम होईल.

त्याशिवाय कर्णधार केन विल्यम्सनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या न्यूझीलंडच्या कसोटी संघात २५ वर्षीय आणि ६ फूट, ८ इंचांचा उंचपुरा वेगवान गोलंदाज जेमिसनलाही प्रथमच स्थान लाभले आहे. भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची सुरुवात करणाऱ्या जेमिसनने पहिल्याच एकदिवसीय लढतीत अष्टपैलू कामगिरी करताना सामनावीर पुरस्कार पटकावला होता. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील अपयशाचा सँटनरला फटका पडला असल्याने डावखुरा फिरकीपटू पटेलला संधी देण्यात आली आहे. सँटनरने भारताविरुद्धच्या मर्यादीत षटकांच्या मालिकेत मात्र उत्तम कामगिरी केली होती.

भारत-न्यूझीलंड यांच्यातील पहिली कसोटी वेलिंग्टनला, तर दुसरी कसोटी २९ फेब्रुवारीपासून ख्राइस्टचर्च येथे खेळली जाणार आहे. यापूर्वी झालेल्या ट्वेन्टी-२० मालिकेत भारताने ५-० असे, तर एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडने ३-० असे यश संपादन केले आहे.

न्यूझीलंडचा संघ

केन विल्यम्सन (कर्णधार), रॉस टेलर, मार्टिन गप्टिल, टॉम ब्लंडेल, कॉलिन डी ग्रँडहोम, कायले जेमिसन, टॉम लॅथम, बीजे वॉटलिंग, डॅरेल मिचेल, टिम साऊदी, नील व्ॉगनर, अजाझ पटेल, ट्रेंट बोल्ट.