भारताचा आज न्यूझीलंडशी पहिला ट्वेन्टी-२० सामना

ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची तयारी हा भारताच्या क्रिकेट कार्यक्रम पत्रिकेतील सर्वात शीर्षस्थानावरील विषय आहे. ऑस्ट्रेलियाला एकदिवसीय मालिकेत नमवल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ दुर्मीळ अशा पाच ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंड संघाशी सामना करतानाही संघबांधणीचे प्रयोग सुरूच असतील. वेगवान गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टीचे प्रमुख आव्हान असलेल्या या मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी होणार आहे.

२०२०चा हंगाम भरगच्च असाच आहे. मायदेशातील मालिका संपल्यानंतर पाचच दिवसांनी परदेशातील ट्वेन्टी-२० सामना खेळावा लागणार आहे. मंगळवारी ऑकलंडला पोहोचताच बुधवारची विश्रांती घेतल्यानंतर गुरुवारी नेटमध्ये कसून सराव केला. संघबांधणी करतानाचे नवनवे प्रयोग एकीकडे चालू असताना व्यग्र वेळापत्रकाचे आव्हान जपून कामगिरीतील सातत्य टिकवणे भारतासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

दुखापतींमुळे प्रमुख खेळाडूंची उणीव : भारत, न्यूझीलंड या दोन्ही संघांना प्रमुख खेळाडूंच्या दुखापतींची तीव्र उणीव भासणार आहे. भारताला शिखर धवन, हार्दिक पंडय़ा, दीपक चहर आणि भुवनेश्वर कुमार यांच्याशिवाय खेळावे लागणार आहे; परंतु सक्षम दुसऱ्या फळीमुळे भारताला किवींचे आव्हान जड जाणार नाही. सर्वोत्तम वेगवान गोलंदाज म्हणून गणना होणारा ट्रेंट बोल्ट, मॅट हेन्री आणि लॉकी फग्र्युसन दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या मालिकेला मुकणार आहेत.

विल्यम्सनच्या नेतृत्वाची परीक्षा

गतवर्षी न्यूझीलंडने भारताला ट्वेन्टी-२० मालिकेत २-१ असे पराभूत केले होते. न्यूझीलंडने श्रीलंका दौऱ्यावरील ट्वेन्टी-२० मालिका २-१ अशी जिंकली, तर इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये दिमाखदार कामगिरी करणाऱ्या न्यूझीलंडला नुकतेच ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिकेत ३-० असे नामोहरम केले आहे. या मानहानीकारक पराभवामुळे खचलेल्या न्यूझीलंडला पुन्हा विजयपथावर आणण्याचे आव्हान कर्णधार केन विल्यम्सनपुढे असेल. या पराभवानंतर विल्यम्सनच्या नेतृत्वापुढेही प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. न्यूझीलंडच्या संघात अष्टपैलू खेळाडूंचा विशेष भरणा आहे. इश सोधी आणि मिशेल सँटनर यांच्यावर संघाच्या फिरकी गोलंदाजीची मदार आहे.

राहुलवर भारताची भिस्त

गेल्या काही महिन्यांत के. एल. राहुलने मर्यादित षटकांच्या दोन्ही क्रिकेटमध्ये आपले स्थान भक्कम केले आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत धवनच्या अनुपस्थितीत सलामीवीराची भूमिका त्याने सशक्तपणे बजावली. मग श्रीलंकेविरुद्ध रोहित शर्माला विश्रांती दिल्यावर धवनसह सलामीची जोडी जमवली. त्यानंतर ऋषभ पंतला दुखापत झाल्यामुळे तो यष्टिरक्षणाची जबाबदारीही लीलया सांभाळतो आहे. आता न्यूझीलंडमध्ये तो रोहितच्या साथीने सलामी देणार आहे. राहुल यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून आत्मविश्वासाने कामगिरी करीत आहे. न्यूझीलंडमध्ये यष्टिरक्षणासह ट्वेन्टी-२० मध्ये तो सलामीला आणि एकदिवसीय प्रकारात मधल्या फळीत फलंदाजी करू शकेल, असे संकेत कर्णधार विराट कोहलीने दिले आहेत. म्हणजेच ५ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत रोहितच्या साथीने पृथ्वी शॉ सलामीला उतरू शकेल.

पंतचे पुनरागमन कठीण

दुखापतीतून सावरलेल्या ऋषभ पंतला आता संघात स्थान मिळवणे कठीण जाणार आहे. भारताने पाच गोलंदाजांसह संघनिवड केल्यास पंत आणि पांडे दोघांनाही स्थान मिळू शकेल. सहाव्या गोलंदाजासाठी अष्टपैलू शिवम दुबेचाही पर्याय उपलब्ध आहे. वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा हे आणखी दोन अष्टपैलू खेळाडू आहेत. श्रेयस अय्यर नियमितपणे चौथ्या क्रमांकावर आणि मनीष पांडे पाचवा विशेषज्ञ फलंदाज संघात असेल. केरळचा यष्टिरक्षक-फलंदाज संजू सॅमसन या शर्यतीत कुठेच दिसत नाही. यजुर्वेद्र चहल आणि कुलदीप यादव जोडी २०१९च्या एकदिवसीय प्रकाराच्या विश्वचषक क्रिकेट स्पध्रेनंतर एकही सामना एकत्रित खेळलेली नाही. जसप्रित बुमरा आणि मोहम्मद शमी यांचे वेगवान माऱ्यातील स्थान निश्चित असले तरी परंतु शार्दूल ठाकूर आणि नवदीप सैनी यांच्यापैकी एकालाच संधी मिळू शकेल.

पराभवाची परतफेड मनातसुद्धा नाही -कोहली

विश्वचषक क्रिकेट स्पध्रेच्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडकडून पराभवामुळे भारताचे संपुष्टात आलेले आव्हान माझ्या जिव्हारी लागले. परंतु न्यूझीलंडशी सामना करताना ‘त्या’ पराभवाची परतफेड करण्याचे धोरण माझ्या ध्यानीमनीसुद्धा नाही, असे कर्णधार कोहलीने स्पष्ट केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा आदर्श निर्माण करणार हा संघ आहे, असे मी सामन्यानंतर इंग्लंडमध्येच नमूद केले होते.

संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल (यष्टिरक्षक), मनीष पांडे, ऋषभ पंत, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, यजुर्वेंद्र चहल, मोहम्मद शमी, जसप्रित बुमरा, शार्दूल ठाकूर, नवदीप सैनी, वॉशिंग्टन सुंदर.

न्यूझीलंड : केन विल्यम्सन (कर्णधार), मार्टिन गप्टिल, रॉस टेलर, स्कॉट कुगेलेइन, कॉलिन मुन्रो, कॉलिन डी ग्रँडहोम, टॉम ब्रूस, डॅरेल मिचेल, मिशेल सँटनर, टिम सेफर्ट (यष्टिरक्षक), हॅमिश बेनेट, इश सोधी, टिम साऊदी, ब्लेअर टिकनर.

वेळ : दुपारी १२.२० वाजल्यापासून थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १  हिंदी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १