भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना रविवारी कानपूरच्या ग्रीनपार्क मैदानावर रंगणार आहे. या सामन्यात विजय मिळवून टीम इंडिया तब्बल आठ वर्षांचा जुना विक्रम मोडीत काढून नवा विक्रम प्रस्थापित करण्यासाठी मैदानात उतरेल. सलामीच्या सामन्यातील पराभवानंतर पुण्यातील सामना जिंकून भारतीय संघाने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.

न्यूझीलंडविरुद्धची एकदिवसीय मालिका जिंकल्यास एखाद्या द्विपक्षीय मालिकेत सलग सात विजय नोंदवण्याचा नवा विक्रम प्रस्थापित करण्याची भारतीय संघाला संधी आहे. यापूर्वी २००७ ते २००९ मध्ये भारतीय संघाने सलग सहा द्विपक्षीय मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता. २०१६ मध्ये झिम्बाव्बे संघासोबतच्या मालिकेपासून नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिका खिशात घालत भारताने सलग सहा मालिका जिंकल्या आहेत. न्यूझीलंडसोबतची मालिका जिंकून सलग सात द्विपक्षीय मालिका जिंकण्याची संधी भारतासमोर आहे.

२०१६ मध्ये भारताने झिम्बाव्बे दौरा केला. यावेळी झिम्बाब्वेविरुद्ध भारताने तीन सामन्यांची मालिका खेळली. ही मालिका भारताने ३-० असे जिंकली होती. त्यानंतर याच वर्षी न्यूझीलंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता. यावेळी पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने न्यूझीलंडला ३-२ असे पराभूत केले.

२०१७ च्या सुरुवातीला भारत दौऱ्यावर आलेल्या इंग्लंडचाही विराट ब्रिगेडने धुव्वा उडवला. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने इंग्लडला २-१ असे पराभूत केले. याचवर्षी वेस्ट इंडिज दौऱ्यावर भारताने पाच सामन्यांची मालिका ३-१ अशी खिशात घातली. तर पाच दिवसांच्या एकदिवसीय मालिकेत पाहुण्या ऑस्ट्रेलियाचा ४-१ असा धुव्वा उडवला. कानपूरमध्ये रंगणाऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवला तर २००७ ते २००९ दरम्यान सलग सहा द्विपक्षीय मालिका जिंकण्याचा विक्रम मोडीत काढून टीम इंडिया नवा विक्रम प्रस्थापित करेल. गतवर्षी न्यूझीलंडचा धुव्वा उडवला असल्यामुळे आणि सध्याचा भारतीय संघाचा फॉर्म पाहता या मालिकेतील अंतिम सामन्यात भारताचे पारडे जड आहे. भारतीय संघ याचा कितपत फायदा घेणार हे उद्याच्या सामन्यानंतरत कळेल.