भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातला चौथा कसोटी सामना गुरुवारपासून सिडनीच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने सध्या 2-1 अशी आघाडी घेतलेली आहे. अखेरच्या सामन्यात विजय किंवा अनिर्णित असा निकाल जरी लागला तरी भारत ही कसोटी मालिका जिंकणार आहे. प्रदीर्घ काळानंतर भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याची संधी समोरुन चालून आलेली आहे. मात्र इतिहास घडवायचा हे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन आपला संघ मैदानात उतरणार नसल्याचं विराट कोहलीने स्पष्ट केलं आहे.

“याआधी काय घडलं हे माझ्या हातात नाही, आणि पुढे जे होणार आहे त्याचा आतापासून विचार करायची गरज वाटत नाही. वर्तमानात जगणं मला नेहमी आवडेल, सिडनीच्या मैदानात आम्ही काय करु शकतो त्यावर अधिक भर देण्याकडे माझा कल आहे. इथपर्यंत येऊन चांगला खेळ करुन कसोटी सामना जिंकणं हे खरचं कठीण आहे, केवळ याच भावनेतून मला कसोटी सामना जिंकायचा आहे.” ऑस्ट्रेलियन भूमित याआधी भारतीय संघाला न जमलेला इतिहास घडवण्याची संधी तुझ्याकडे आहे, या विचारलेल्या प्रश्नावर विराट कोहली बोलत होता.

अवश्य वाचा – BLOG : सिडनीचं मैदान, स्टिव्ह वॉ चा अखेरचा सामना मात्र लक्षात राहिला तो सचिन रमेश तेंडुलकर !

एखाद्या देशात जेव्हा तुम्ही जाता तेव्हा त्या संघाविरोधात तुम्ही खेळत नसता. त्या संघाच्या निमीत्ताने त्यांच्या लाखो पाठीराख्यांशीही तुमचा सामना असतो. जेव्हा तुम्ही फलंदाजीसाठी मैदानात उतरता तेव्हा उपस्थित 40 हजारांच्या जमावाला तुमची विकेट हवी आहे अशी भावना तुमच्या मनात येते. त्यामुळे याआधी संघांना न जमलेली गोष्ट आम्ही करुन दाखवली आणि इतिहास घडवण्याची संधी अशा गोष्टींचा विचार करुन काहीच उपयोग होणार नसल्याचंही कोहलीने स्पष्ट केलं.