विश्वचषक हॉकी स्पर्धा २०१८

सलग दुसऱ्या विजयासह उपांत्यपूर्व फेरीचे लक्ष्य

मायदेशात सुरू असलेल्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत दमदार सुरुवात केल्यानंतर आता भारतीय हॉकी संघासमोर जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या बेल्जियमचे आव्हान असणार आहे. रविवारी रंगणाऱ्या या सामन्यात मात्र भारताने हे आव्हान पार केले तर यजमानांचा उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित होणार आहे.

४३ वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी उत्सुक असलेल्या भारतीय संघाने बुधवारी झालेल्या सलामीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ५-० असा धुव्वा उडवला होता. रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकावणाऱ्या बेल्जियमला पहिल्या सामन्यात चमक दाखवता आली नव्हती. दुबळ्या कॅनडावर त्यांनी २-१ असा निसटता विजय मिळवला होता.

भारताने आफ्रिकेविरुद्ध आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत सर्वानाच अचंबित केले होते. आता बेल्जियमविरुद्धही त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी भारतीय संघ इच्छुक आहे. कामगिरीतील सातत्याचा अभाव ही डोकेदुखी भारताला सतावत असली तरी ‘रेड लायन्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेल्जियमविरुद्ध सर्व आघाडय़ांवर सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.

मनदीप सिंग, सिमरनजीत सिंग, आकाशदीप सिंग आणि ललित उपाध्याय या भारतीय संघातील आघाडीवीरांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रभावी कामगिरी केली होती. सिमरनजितने दोन तर अन्य तिघांनी प्रत्येक एक गोल करत आपली छाप पाडली होती. मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील खेळाडूंनी मधल्या फळीत चांगला खेळ केला होता. आता बेल्जियमचे आक्रमण थोपविण्यासाठी गोलरक्षक पी. आर. श्रीजेशसह हरमनप्रीत सिंग, बिरेंद्र लाकरा आणि सुरेंदर कुमार यांना कंबर कसावी लागेल.

‘‘गेल्या दशकात बेल्जियम हा संघ जागतिक हॉकीमधील अव्वल संघांमध्ये गणला जातो. मात्र त्यांना प्रतिष्ठेच्या स्पर्धाच्या जेतेपदाने कायम हुलकावणी दिली आहे. पहिल्या सामन्यात कमी गोल झळकावता आले तरी आता आम्ही भारताविरुद्धच्या सामन्याकडे लक्ष केंद्रित केले असून हा सामना जिंकणे आमच्यासाठी अनिवार्य आहे,’’ असे बेल्जियमचे प्रशिक्षक शेन मॅकलोएड म्हणाले.

भारताला सुवर्णपदक जिंकण्याची संधी -ब्रासा

विश्वचषक हॉकी स्पर्धेतील पहिल्या सामन्यातील कामगिरी पाहता, भारताला सुवर्णपदक जिंकण्याची आणि आपला ४३ वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याची हीच उत्तम संधी आहे, असे एकेकाळचे भारताचे प्रशिक्षक होजे ब्रासा यांनी सांगितले. गेल्या दशकातील भारतीय हॉकीच्या पुनरुज्जीवनावर प्रभावित होऊन ते म्हणाले, ‘‘कामगिरीत सातत्य हेच भारताचे यश ठरणार आहे. घरच्या चाहत्यांसमोर खेळताना अन्य पदकाऐवजी भारताला सुवर्णपदकच सहज पटकावता येईल. कोणत्याही प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्याइतपत भारतीय संघ सक्षम बनला आहे. ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, हॉलंड आणि जर्मनीइतकाच भारतीय संघ बलाढय़ आहे.’’

१९आतापर्यंत भारत आणि बेल्जियम १९ वेळा एकमेकांशी भिडले असून त्यात भारताने पाच वेळा तर बेल्जियमने १३ वेळा बाजी मारली आहे. एक सामना बरोबरीत सुटला आहे.

१-१भारत आणि बेल्जियम यांच्यात झालेला अखेरचा सामना १-१ असा बरोबरीत सुटला होता. या सामन्यात भारताने अखेरच्या क्षणी गोल स्वीकारला होता.

बेल्जियमविरुद्धचा सामना आमच्यासाठी उपउपांत्यपूर्व फेरीसारखाच ठरणार आहे. आमच्यावर कोणतेही दडपण नाही. जर आम्हाला उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित करावयाचे असेल तर हा सामनाजिंकावाच लागेल. आम्ही एका वेळी एकाच सामन्याचा विचार करत असून भारताला आपल्या क्षमतेनिशी सर्वोत्तम खेळ करावा लागेल. गेल्या ४-५ वर्षांत बेल्जियमच्या कामगिरीवर नजर टाकली तर तो एक चांगला संघ असल्याचे लक्षात येते. गेल्या ५-६ महिन्यात भारताने आक्रमक हॉकीचे प्रदर्शन केले आहे. हीच आमची मुख्य ताकद असेल.

– हरेंद्र सिंग, भारताचे प्रशिक्षक

आजचे सामने

* कॅनडा वि. द. आफ्रिका

सायं. ५ वा.

* भारत वि. बेल्जियम

सायं ७ वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, सिलेक्ट १