नवी दिल्ली : इराण येथे झालेल्या माकरान चषक बॉक्सिंग स्पर्धेत राष्ट्रीय विजेत्या दीपक सिंगने (४९ किलो) सुवर्णपदक पटकावण्याची किमया साधली. या स्पर्धेत भारताने एक सुवर्ण तसेच पाच रौप्यपदकांची कमाई केली.

दीपकने अंतिम फेरीत जाफर नासेरी याचे आव्हान संपुष्टात आणले. दीपक वगळता भारताच्या अन्य पाच बॉक्सर्सनी अंतिम फेरीत निराशा केली. पी. ललित प्रसाद (५२ किलो), राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदक विजेता मनीष कौशिक (६० किलो), दुर्योधन सिंग (६९ किलो), संजीत (९१ किलो) आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदक विजेता सतीश कुमार (९१ किलोवरील) यांना सर्वोत्तम कामगिरी करण्यात अपयश आल्याने रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले.

मनीषला डॅनियल शाह बक्ष याच्याकडून तर सतीशला मोहम्मद मिलासकडून हार पत्करावी लागली. संजीतला एल्डिन घोस्सून याने पराभूत केले. प्रसादला ओमिद साफा अहमदीचा तर दुर्योधनला सज्जद झादेह केझिम याचा अडसर दूर करता आला नाही. तत्पूर्वी, रोहित टोकास (६४ किलो) आणि मनजीत सिंग पांघल (७५ किलो) यांनी या स्पर्धेत कांस्यपदक प्राप्त केले होते.