घरच्या मैदानावर सुपरसीरिज स्पर्धेचे जेतेपद पटकावण्यासाठी ऑलिम्पिक पदकविजेत्या सायना नेहवाल आणि पी.व्ही. सिंधू सज्ज झाल्या आहेत. लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक विजेत्या सायनाने दोन वर्षांपूर्वी या स्पर्धेचे जेतेपद पटकावत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली होती. या यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी सायना आतुर आहे. मात्र गुडघ्याच्या दुखापतीमुळे सायनाच्या हालचालींवर मर्यादा आल्या आहेत.

‘‘दिल्लीत होणारी ही स्पर्धा माझ्यासाठी खास आहे. दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत मी सुवर्णपदकाची कमाई केली होती. २०१५ मध्ये या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. त्या जेतेपदानंतरच जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली होती. अशा संस्मरणीय आठवणींमुळेच हे शहर, ही स्पर्धा माझ्यासाठी विशेष आहे. चाहत्यांच्या प्रचंड पाठिंब्यात खेळण्याचा अनुभवही खास असतो,’’ असे सायनाने सांगितले.

जेतेपद पटकावण्यासाठी स्पर्धा अतिशय तीव्र आहे. मात्र गेले काही महिने मी चांगला खेळ करते आहे. याही स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

पी.व्ही. सिंधू घरच्या मैदानावर सुपरसीरिज स्पर्धेचे जेतेपद नावावर करण्यासाठी तयार आहे. ‘‘या स्पर्धेसाठी कसून मेहनत घेतली आहे. बॅडमिंटन विश्वातले अव्वल खेळाडू सहभागी होत असल्याने प्रत्येक लढत चुरशीची होणार आहे,’’ असे सिंधूने सांगितले.

सिंधूला तृतीय मानांकन देण्यात आले असून दुसऱ्या फेरीत तिची लढत साइना कावाकामीशी होईल. सायना आणि पॉर्नपुवाई चोचूवाँग यांच्यात दुसऱ्या फेरीचा मुकाबला होईल.