दोन गेममध्ये सामना जिंकत डेन्मार्कचा व्हिक्टर एक्सेलसेन विजेता

प्रदीर्घ काळापासून विजेतेपदापासून वंचित राहिलेल्या किदम्बी श्रीकांतला इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतदेखील उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सेलसेनने श्रीकांतला दोन गेममध्ये २१-७, २२-२० असे पराभूत करीत विजेतेपदावर नाव कोरले.

पहिल्या गेममध्ये दणकून मार खाल्ल्यानंतर श्रीकांतने दुसऱ्या गेममध्ये प्रयत्नांची शर्थ करूनदेखील एक्सेलसेनने त्याला अजिबात संधी मिळू दिली नाही. श्रीकांत सुमारे १७ महिन्यांच्या प्रदीर्घ काळानंतर प्रथमच सुपर सीरिजच्या अंतिम सामन्यात पोहोचण्यात यशस्वी झाला होता. त्यामुळे हा सामना जिंकून प्रदीर्घ काळापासून असलेला विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यास तो उत्सुक होता. मात्र, पहिल्या गेममध्ये प्रारंभीचे काही गुण समसमान स्तरावर गेल्यानंतर एक्सेलसेनने स्मॅशच्या फटक्यांची बरसात करीत श्रीकांतला जेरीस आणले. एक्सेलसेनने त्याच्या उंचीचा फायदा घेतानाच श्रीकांतच्या बॅकहँडवर अधिकाधिक फटके मारीत गुण वसूल केले. त्यामुळे पहिला गेम एक्सेलसेनने २१-७ असा सहज जिंकला.

दुसऱ्या गेममध्ये श्रीकांतने प्रारंभी ५-१ अशी आघाडी घेतली होती. मात्र, एक्सेलसेनने मध्यंतराला ११-९ अशी आघाडी घेत गेम बरोबरीत आणला. त्यानंतर १२-१२, १४-१३ अशी आघाडी घेत श्रीकांतने पुन्हा गेममध्ये परतण्याची संधी निर्माण केली.

अखेरच्या क्षणी तर श्रीकांत २०-१८ असा गेम जिंकून सामना बरोबरीत आणण्याच्या बिंदूवर पोहोचला होता. हा गेम जिंकत सामना १-१ असा बरोबरीत आणण्याची श्रीकांतला संधी होती. मात्र, एक्सेलसेनने त्यानंतर वेगवान खेळाचे प्रदर्शन घडवत सलग चार गुण वसूल करीत २२-२० असा गेम जिंकत अझलन शाह चषक विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.