नवी दिल्ली : इंडिया खुली बॅडमिंटन स्पर्धा यंदा २६ ते ३१ मार्चदरम्यान रंगणार असून ही स्पर्धा प्रथमच इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. गेल्या सात वर्षांपासून ही स्पर्धा सिरी फोर्ट क्रीडा संकुलात भरवली जात होती. मात्र यंदा प्रथमच ही स्पर्धा इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय संकुलात भरवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

१९८२ साली आशियाई क्रीडा स्पर्धाचे आयोजन झाल्यानंतर गतवर्षी झालेल्या जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा या क्रीडा संकुलात पार पडल्या होत्या. संपूर्ण स्पर्धा खाशाबा जाधव सभागृहात झाल्या होत्या. त्या स्पर्धेत भारतीय बॉक्सर्सनी दमदार कामगिरीची नोंद केली होती. त्याप्रमाणेच पुन्हा त्याच स्टेडियमवर स्पर्धा भरवून भारतीय बॅडमिंटनपटू दमदार कामगिरी करतील, असा विश्वास भारताच्या बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष हिमांता विश्व शर्मा यांनी व्यक्त केला आहे.

इंडिया खुली राष्ट्रीय स्पर्धा ही २०११ पासून बीडब्ल्यूएफ सुपर सीरिज स्पर्धेचा भाग आहे. टोक्यो ऑलिम्पिक २०२० मध्ये थेट प्रवेशासाठी ही स्पर्धा जिंकून पात्र होण्यासाठी अधिकाधिक अव्वल बॅडमिंटनपटू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.