अमित पांघलची ऑलिम्पिक विजेत्या हसनबॉयवर पुन्हा सरशी

भारताचा बॉक्सर कविंद्र सिंग बिश्त याने (५६ किलो) जगज्जेत्या कैराट येरालियेव्ह याला पराभवाचा धक्का देत आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. अमित पांघल यानेही (५२ किलो) ऑलिम्पिक विजेत्या हसनबॉय दुसमाटोव्ह याच्यावर पुन्हा एकदा सरशी साधली.

कविंद्र सिंगने अटीतटीच्या रंगलेल्या लढतीत कझाकस्तानच्या येरालियेव्ह याला ३-२ असे पराभूत केले. जीबी बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करणाऱ्या उत्तराखंडच्या कविंद्रने पुन्हा एकदा आपल्या कामगिरीत सातत्य राखत किमान कांस्यपदक निश्चित केले आहे. रोहतकच्या अमितने आशियाई स्पर्धेत दोन वेळा सुवर्णपदक पटकावणाऱ्या आणि जागतिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या दुसमाटोव्हला ४-१ असे सहज पराभूत केले. अमितचा हा दुसमाटोव्हवरील सलग दुसरा विजय ठरला.

‘‘प्रशिक्षकांसह आखलेल्या सर्व रणनीती या सामन्यात उपयोगी ठरल्या. या विजयाने मी आनंदी असून आता सुवर्णपदक पटकावण्याकडे माझे लक्ष लागले आहे. पुढील सामन्यासाठीही मी अचूक रणनीती आखणार असून सुवर्णपदक घेऊनच मायदेशी परतणार आहे,’’ असा विश्वास अमितने व्यक्त केला.

महिलांमध्ये, जागतिक स्पर्धेत रौप्यपदक पटकावणाऱ्या हरयाणाच्या २१ वर्षीय सोनिया चहलने (५७ किलो) आपला सामना सहज जिंकत उपांत्य फेरीत स्थान मिळवले. सोनियाने शांत, संयमी खेळ आणि परिपक्वतेचे दर्शन घडवत कोरियाच्या जो सोन वा हिच्यावर ३-२ असा सनसनाटी विजय मिळवला.

दरम्यान, २०१८च्या जागतिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या लव्हलिना बोर्गोहेन हिला जागतिक विजेत्या चेन निएन-चिन हिच्याकडून ०-५ असा पराभवाचा धक्का सहन करावा लागला. सीमा पूनिया हिलाही तीन वेळा जागतिक विजेत्या ठरलेल्या चीनच्या झाओली यँग हिने ०-५ असे पराभूत केले. पुरुषांमध्ये, रोहित टोकस (६४ किलो) याचे आव्हान मोंगोलियाच्या चिनझोरिग बाटारसूख याने ३-२ असे संपुष्टात आणले.