उपांत्य फेरीत चीनच्या ली झुरूईचा विजय; जेतेपदासाठी थायलंडच्या रॅटचनोक इंटानोनचे आव्हान

भारताच्या सायना नेहवालला इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पध्रेच्या उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. चीनच्या ली झुरूईने एक तास १२ मिनिटे चाललेल्या संघर्षमय लढतीत गतविजेत्या सायनाला २२-२०, १७-२१, २१-१९ असे पराभूत केले. नवी दिल्ली येथे सिरी फोर्ट क्रीडा संकुलात सुरू असलेल्या या स्पध्रेत सायनाच्या पराभवामुळे भारतीयांचे आव्हानही संपुष्टात आले आहे.

अंतिम फेरीत झुरूईसमोर थायलंडच्या रॅटचनोक इंटानोनचे आव्हान असणार आहे. रॅटचनोकने उपांत्य फेरीत कोरियाच्या बाए येऑन जूचा २१-८, २१-११ असा सहज पराभव केला.

रिओ ऑलिम्पिक स्पध्रेच्या तयारीच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या स्पध्रेत सायनाने दमदार खेळाचे प्रदर्शन घडविले. पहिला गेम गमावल्यानंतरही सायनाने दमदार पुनरागमन करताना चिनी खेळाडूला कडवी टक्कर दिली. २०१० आणि २०१५मध्ये या स्पध्रेचे जेतेपद पटकावणाऱ्या सायनाने पहिल्या गेममध्येही लढाऊ वृत्ती दाखवली. या लढतीपूर्वी जय-पराजयाच्या आकडेवारीत झुरूईची (१०-२) बाजू वरचढ असली तरी सायनाची खेळी कौतुकास पात्र ठरली.
पहिल्या गेममध्ये तोडीसतोड खेळ करूनही सायनाला २०-२२ असा पराभव पत्करावा लागला, परंतु त्याने खचून न जाता तिने दुसऱ्या गेममध्ये जोरदार पुनरागमन केले. सायनाने दुसरा गेम २१-१७ असा जिंकून सामना १-१ असा बरोबरीत आणला.
तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये सायनाने सुरुवातीला आघाडी घेऊन झुरूईवर दडपण निर्माण केले. मात्र,
जय-पराजयाच्या आकडेवारीत वरचढ असलेल्या झुरूईने अप्रतिम खेळ करून सामना ११-१८ अशा पिछाडीवरून
१९-१९ अशा बरोबरीत आणला.

या वेळी प्रेक्षकगृहात उपस्थित असलेली सायनाची आई प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसली. प्रेक्षकात बसून ती सायनाला शांतपणे खेळ करण्याचा सल्ला देत होती. दोन्ही खेळाडूंमध्ये रंगलेली रॅलीची जुगलबंदी प्रेक्षकांची वाहवाह मिळवून गेली. अखेरीस झुरूईने झटपट दोन गुणांची कमाई करून तिसरा गेम २१-१९ असा जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला.
११ : ली झुरूई आणि सायना नेहवाल यांच्यात आतापर्यंत झालेल्या १३ सामन्यांत झुरूईने सर्वाधिक ११ विजय मिळवले आहेत.
एक-दोन गुणांच्या फरकाने सामन्याचे चित्र बदलले. झुरूईने अखेरचे दोन गुण झटपट कमावले. ती रेषेजवळ खेळ करत होती आणि त्यामुळेच तिने विजय मिळवला. माझ्याकडून काही तुरळक चुका झाल्या. माझ्या खेळावर मी समाधानी आहे.

-सायना नेहवाल