करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे खीळ बसलेलं क्रीडाविश्व हळुहळु रुळावर येत आहे. Badminton World Federation ने यंदाच्या वर्षाचं सुधारित वेळापत्रक जाहीर केलं आहे. ऑलिम्पिक पात्रता फेरीचा दर्जा असलेली India Open स्पर्धा ८ ते १३ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलेली आहे. २४ ते २९ मार्च दरम्यान ही स्पर्धा नवी दिल्लीत खेळवली जाणार होती. हैदराबाद ओपन (११ ते १६ ऑगस्ट) पासून हंगामाची सुरुवात होणार असून १७ ते २२ नोव्हेंबर दरम्यान सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळवली जाणार आहे.

याव्यतिरीक्त न्यूझीलंड, इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड आणि World Tour Finals या स्पर्धांच्या तारखाही बदलण्यात आल्या आहेत. “बंद पडलेल्या बॅडमिंटन स्पर्धा पुन्हा रुळावर आणणं हे जिकरीचं काम होतं. यंदाचं वेळापत्रक हे खूप व्यस्त होतं. मात्र सध्याच्या खडतर परिस्थितीत सरकारी नियम डोळ्यासमोर ठेवून नवीन वेळापत्रकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे.” BWF चे सचिव थॉमस लुंड यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. जगभरातील घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत, आणि सर्व परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा सुरु करणार असल्याचं लुंड यांनी स्पष्ट केलं.