आशियाई चषक फुटबॉल स्पर्धा

आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेला अबू धाबी येथे शनिवारपासून प्रारंभ झाला असून भारताच्या अभियानाला रविवारी थायलंडविरुद्धच्या सामन्याने सुरुवात होणार आहे.

रविवारी अ-गटातील भारताचा पहिला सामना अल नाहयान स्टेडियमवर थायलंडशी होणार आहे. त्यानंतर दुसरा सामना १० जानेवारीला संयुक्त अरब अमिरातीशी तर तिसरा सामना बहारिनशी १४ जानेवारीला होणार आहे.

आशियाई चषक स्पध्रेत या वर्षीपासून १६ ऐवजी २४ संघांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे सहा गटांमधील प्रत्येकी २ संघ तसेच तृतीय स्थानावरील ४ संघ अशा एकूण १६ संघांना साखळी फेरीतून पुढे जाण्याची संधी मिळेल.

 

तब्बल ५५ वर्षांनंतर..

भारत यापूर्वीच्या पाच दशकात केवळ १९८४ आणि २०११ या वर्षीच्या आशिया चषकांसाठीच पात्र झाला होता. मात्र, त्या दोन्ही वेळी भारत साखळी फेरीतच बाद झाला होता. १९६४ साली एकदाच भारत उपविजेता ठरला होता. त्यानंतर तब्बल ५५ वर्षांनी भारताला पुन्हा एकदा साखळी फेरीचा अडथळा ओलांडून पुढे पोहोचण्याची आशा वाटत आहे.

अमिरातीशी लढत आव्हानात्मक -झिंगन

आशियाई फुटबॉल स्पर्धेतील अ-गटातून पुढे जाण्यासाठी भारताला संयुक्त अरब अमिरातीशी संघर्ष करावा लागणार आहे. ते स्पर्धेचे यजमान असले तरी झुंज देण्याची जबाबदारी आमच्यावर असून ती लढत आव्हानात्मक असल्याचे भारताचा बचावपटू संदेश झिंगन याने सांगितले. मात्र, कोणताही संघ जर पूर्ण बहरात नसेल किंवा अतिआत्मविश्वासाने खेळत असेल तर त्यांना पराभूत करता येते.’’

सामन्याची वेळ : रात्री ७ वाजल्यापासून

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, आणि ३