उगवत्या सूर्याचा देश म्हणून जपान ओळखला जातो. याच सूर्याला प्रमाण मानून जपानच्या संघाने थॉमस आणि उबेर चषकात सोनेरी अध्याय लिहिला. थॉमस चषकात गतविजेत्या आणि बलाढय़ चीनला तर उबेर चषकात भारताला ३-२ असे नमवत जपानने अंतिम फेरीत धडक मारली. थॉमस चषकाचे पहिले तर उबेर चषकाचे चौथे जेतेपद पटकावत इतिहास रचण्याची त्यांना सुवर्णसंधी आहे. सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांनी पहिले दोन्ही सामने जिंकल्यानंतरही भारताला पराभवाचा धक्का सहन करावा लागला.
‘फॉर्म इज टेंपररी, क्लास इज परमनंट’ या उक्तीला जागत सायना नेहवालने झंझावाती खेळासह जपानच्या मितान्सु मितानीवर २१-१२, २१-१३ असा सहज विजय मिळवला. ४-१ अशा आघाडीसह सायनाने आत्मविश्वासपूर्ण सुरुवात केली. मितानीने सलग तीन गुण घेत पुनरागमन केले. मितानीच्या चुकांचा योग्य फायदा उठवत सायनाने १२-६ अशी भक्कम आघाडी घेतली. ताकदवान आणि भेदक स्मॅशच्या जोरावर सायनाने ही आघाडी वाढवत पहिला गेम नावावर केला. दुसऱ्या गेममध्ये २-२ अशा बरोबरीनंतर मितानीने ६-३ अशी आघाडी मिळवली. सायनाने ११-९ अशी आघाडी मिळवली. मितानीने एक गुण घेत प्रतिकार केला परंतु सायनाने सलग ९ गुणांची कमाई करत सामन्यावर कब्जा केला.
आणखी एका थरारक मुकाबल्यात सिंधूने सायाका ताकाहाशीवर १९-२१, २१-१८, २६-२४ असा विजय मिळवला. पहिल्या गेममध्ये ताकाहाशीने ड्रॉप आणि नेटजवळच्या फटक्यांचा चतुराईने उपयोग करत पहिला गेम नावावर केला. दुसऱ्या गेममध्ये एकेक गुणासाठी कडवी झुंज रंगली. एकाग्रतेचा भंग होऊन सिंधूच्या हातून वारंवार चुका झाल्या. मात्र यातून सावरत सिंधूने पुनरागमन केले आणि वेगवान आक्रमण आणि नेटजवळून अचूक खेळ करत दुसरा गेम जिंकला आणि आव्हान जिवंत राखले.
तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये जोरदार रॅली आणि स्मॅशेसवर भर देत सिंधूने आक्रमण केले. ताकाहाशीच्या हातून झालेल्या चुकांचा फायदा उठवत सिंधूने ८-३ अशी भक्कम आघाडी घेतली. मात्र ताकाहाशीने यानंतर अफलातून खेळ करत ११-८ असे प्रत्युत्तर दिले. ड्रॉप, क्रॉसकोर्ट, स्मॅश अशा सगळ्या फटक्यांचा नेमकेपणाने वापर करत ताकाहाशीने सलग आठ गुणांसह आघाडी मिळवली. सिंधूने आपला खेळ उंचावत १७-१४ अशी दमदार आघाडी घेतली. याकाहाशीने जोरदार आक्रमण करत १७-१७ अशी बरोबरी केली. लाइन कॉल तंत्रज्ञानाचा अचूक वापर करत सिंधूने १८-१७ अशी आघाडी मिळवली. जोरदार स्मॅशच्या फटक्यासह तिने १९-१८ अशी आगेकूच केली. यानंतर सिंधूच्या हातून चुका झाल्या आणि याकाहाशीने २०-२० अशी बरोबरी केली. २१-२१, २२-२२, २३-२३ असा मुकाबला रंगला. दडपणामुळे दोघींच्याही हातून चुका झाल्या. याकाहाशीच्या चुकांचा फायदा उठवत अखेर सिंधूने २६-२४ अशी बाजी मारली आणि भारताला २-० आघाडी मिळवून दिली.
तिसऱ्या लढतीत मिसाकी मातसुतोमो-अयाका ताकाहाशी जोडीने ज्वाला गट्टा-अश्विनी पोनप्पा जोडीवर २१-१२, २०-२२, २१-१६ असा विजय मिळवत भारताचा विजयरथ रोखला. फटक्यांवरचे नियंत्रण, सातत्याने झालेल्या चुका यामुळे भारताच्या जोडीला पराभवाला सामोरे जावे लागले. चौथ्या लढतीत इरिको हिरोसेने पी. सी. तुलसीवर २१-१४, २१-१५ अशी सहज मात केली. पाचव्या आणि अखेरच्या लढतीत मियुकी मेएडा-रेइका काकिवा जोडीने सायना-सिंधूला २१-१४, २१-११ असे हरवले.

लंडन ऑलिम्पिकनंतरची माझी कामगिरी पाहता, या स्पर्धेत मी इतकी चांगली खेळेन असा विश्वास कुणालाही नव्हता. परंतु एकदा सूर गवसणे आवश्यक होते. मी कसून मेहनत करत होते. मितानी चांगली खेळाडू आहे, तिला नमवता आले याचे आनंद आहे. पदक कोणते यापेक्षाही देशासाठी सर्वोत्तम कामगिरी करणे माझे उद्दिष्ट आहे.
सायना नेहवाल

ताकाहाशी चांगली खेळाडू आहे. तिसऱ्या गेममध्ये तिने सलग आठ गुण पटकावत भक्कम आघाडी घेतली. परंतु गोपीचंद सरांनी शांत राहून नैसर्गिक खेळ करण्याचा सल्ला दिला. माझ्या चुकांमुळे विजय कठीण बनला. अव्वल खेळाडूंविरुद्ध विजय मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो.
पी. व्ही. सिंधू