गतविजेत्या भारताची चॅम्पियन्स क्रिकेट स्पर्धेतील सलामीच्या लढतीत पाकिस्तानशी गाठ पडणार आहे. ही स्पर्धा इंग्लंडमध्ये पुढील वर्षी १ ते १८ जून दरम्यान आयोजित केली जाणार आहे.
भारत व पाकिस्तान हा सामना ४ जून २०१७ रोजी एजबस्टन (बर्मिगहॅम) येथे होईल. या स्पर्धेतील सामने कार्डिफ वेल्स स्टेडियम व दी ओव्हल स्टेडियम येथेही होणार आहेत. इंग्लंडला सलामीच्या लढतीत बांगलादेशच्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे, तर श्रीलंकेला दक्षिण आफ्रिकेशी झुंजावे लागणार आहे. या स्पर्धेत बाद फेरीतील तीन सामन्यांसह पंधरा सामने आयोजित केले जाणार आहेत.
जागतिक क्रमवारीत ३० सप्टेंबर २०१५ पर्यंत पहिल्या आठ क्रमांकावर असलेल्या संघांना या स्पर्धेत स्थान देण्यात आले आहे. ‘अ’ गटात ऑस्ट्रेलिया (अव्वल मानांकन), न्यूझीलंड (चौथे मानांकन), इंग्लंड (सहावे मानांकन) व बांगलादेश (सातवे मानांकन) यांचा समावेश आहे. बांगलादेशचा संघ २००६ नंतर प्रथमच या स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. ‘ब’ गटात भारत (द्वितीय मानांकन), दक्षिण आफ्रिका (तृतीय मानांकन), श्रीलंका (पाचवे मानांकन) व पाकिस्तान (आठवे मानांकन) यांना स्थान देण्यात आले आहे. प्रत्येक गटातील पहिले दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. हे सामने अनुक्रमे १४ व १५ जून रोजी होतील. अंतिम सामना १८ जून रोजी ओव्हल मैदानावर होईल.