भारत आणि पाकिस्तानच्या राष्ट्रीय टेनिस संघटनांची आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाकडे मागणी

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील राजकीय संबंध बिघडले असतानाच, इस्लामाबाद येथे पूर्वनियोजित असलेल्या डेव्हिस चषकाच्या लढतीसाठी आता त्रयस्थ ठिकाणाची निवड करावी, अशी मागणी भारत आणि पाकिस्तानच्या राष्ट्रीय टेनिस संघटनांनी आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाकडे (आयटीएफ) केली आहे.

केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरमधील ३७० कलम रद्द करत या राज्यांना केंद्रशासित प्रदेशांचा दर्जा बहाल केल्यानंतर पाकिस्तानने बुधवारी भारताविरुद्धचे राजकीय संबंध कमी केले. पाकिस्तानमधील भारताच्या दूतावासानेही देश सोडण्यास सांगितले आहे.

‘‘सध्या राजकीय स्तरावर सुरू असलेल्या घडामोडींचा या लढतीला फटका बसू शकतो. याविषयी आताच बोलणे घाईचे ठरेल, मात्र एक-दोन दिवसांत परिस्थिती स्पष्ट होईल. त्यानंतर आम्ही आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाला परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन निर्णय घ्यायला सांगू. त्रयस्थ ठिकाणाची निवड ‘आयटीएफ’ने करावी, अशी आमची मागणी आहे,’’ असे अखिल भारतीय टेनिस महासंघाचे (एआयटीए) सरचिटणीस हिरोन्मोय चॅटर्जी यांनी सांगितले.

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे १४ आणि १५ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या डेव्हिस लढतीसाठी भारतीय महासंघाने खेळाडूंच्या व्हिसासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे. ‘‘जर पाकिस्तानने आम्हाला व्हिसा बहाल केला नाही तर आम्ही पाकिस्तानात कसे जाऊ? पाकिस्तानने व्हिसा दिला तरी आम्हाला सुरक्षित वाटेल अशी ते सुरक्षाव्यवस्था पुरवू शकतात का?’’ असा सवालही चॅटर्जी यांनी विचारला आहे. १९६४नंतर भारताच्या डेव्हिस चषक संघाने पाकिस्तानचा दौरा केलेला नाही.

पाकिस्तानने अनेक लढती त्रयस्थ ठिकाणी खेळल्या आहेत. सद्य परिस्थिती संवेदनशील असल्यामुळे आम्ही ‘आयटीएफ’कडे त्रयस्थ ठिकाणाची मागणी करणार आहोत. मात्र आम्ही पाकिस्तानात जाणार नाही, असे म्हणणार नाही. आम्हाला दंड बसेल, असे आम्ही वागणार नाही. लढतीसाठीचे सुरक्षा निकष हे आयटीएफ ठरवत असते. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास, सर्व जबाबदारी त्यांची असते. या परिस्थितीत आयटीएफही केंद्र सरकारच्या अहवालाची प्रतीक्षा करत आहे.

-हिरोन्मोय चॅटर्जी, अखिल भारतीय टेनिस महासंघाचे सरचिटणीस

दोन्ही देशांमधील तणाव वाढत चालला असून आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघ जो काही निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य असेल. इस्लामाबाद हे शहर सध्या तरी सुरक्षित आहे. तणाव वाढत असला तरी तो कोणत्याही क्षणी निवळेल. जिंकणे किंवा हरणे महत्त्वाचे नसून खेळाडूंची सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे.

-सलीम सैफुल्ला खान, पाकिस्तान टेनिस महासंघाचे अध्यक्ष