भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी नवी दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावर झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात पाकिस्तान संघ जाणुनबुजून हरला, असा आरोप करत इंग्लंडचा माजी यष्टिरक्षक पॉल निक्सन याने नव्या वादाला तोंड फोडले आहे.
रोमहर्षक झालेल्या या सामन्यात भारताने १० धावांनी विजय मिळवून लाज वाचवली असली तरी निक्सन यांच्या आरोपांनी क्रीडाजगतात खळबळ माजवून दिली आहे. ‘‘पाकिस्तान या सामन्यात जाणुनबुजून हरला, असेच दिसत आहे. फार कमी धावांची आवश्यकता असतानाही पाकिस्तानने विकेट फेकल्या. शेवटच्या काही चेंडूत सामन्याला कलाटणी मिळाली. पाकिस्तानने अखेरच्या चेंडूंमध्ये सामना गमावला,’’ असा आरोप निक्सन याने ‘ट्विटर’द्वारे केला आहे. पाकिस्तानने शेवटचे सहा बळी अवघ्या ३८ धावांत गमावले होते. हा सामना जिंकून भारताने पाकिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत पहिला विजय मिळवण्यात यश मिळवले.
निक्सनने सांगितले की, ‘‘तुम्ही हा सामना पाहिलात का? लेगस्लिपमध्ये क्षेत्ररक्षक असतानाही स्विपचा फटका मारण्याचा मोहम्मद हाफीझचा प्रयत्न हास्यास्पद होता. हाफीझ हा भारताचा मैदानावीरल १२वा खेळाडू वाटत होता. मालिका आधीच खिशात घातल्यामुळे हा सामना गमावणे पाकिस्तानसाठी तोटय़ाचे नव्हते. २-० अशी मालिका जिंकल्यानंतर पाकिस्तानसाठी कोणताही फरक पडणार नव्हता. पण या सामन्यात नक्कीच काहीतरी विचित्र घडले आहे, हे निश्चित.’’
इंग्लंडसाठी निक्सनने १९ एकदिवसीय आणि एक ट्वेन्टी-२० सामन्यात प्रतिनिधित्व केले आहे. वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत तो इंग्लंडतर्फे खेळला होता. एक ट्वेन्टी-२० सामना गमावण्यासाठी भारतातील एका बुकीने माझ्यासमोर पाच दशलक्ष डॉलरचा प्रस्ताव ठेवला होता, असे विधान जून २०१२मध्ये करत निक्सन याने खळबळ उडवली होती.