News Flash

विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्याचा निर्णय सरकारशी चर्चेनंतरच!

माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि मोहम्मद अझरुद्दीन यांनी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालण्याची मागणी केली आहे.

विनोद राय

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) प्रशासकीय समिती शुक्रवारी झालेल्या बैठकीत विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमधील पाकिस्तानविरुद्धच्या लढतीबाबत कोणताही निर्णय घेऊ शकली नाही. परंतु केंद्र सरकारशी सल्लामसलत करूनच भूमिका ठरवू, असे स्पष्ट केले आहे. याचप्रमाणे दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या राष्ट्राविरोधात सामने खेळू नयेत, असे आवाहन भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) सदस्य राष्ट्रांना केले जाणार आहे.

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४०हून अधिक केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान शहीद झाल्यानंतर ओल्ड ट्रॅफर्ड येथे १६ जूनला होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या विश्वचषक सामन्यावर भारताने बहिष्कार घालावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. प्रशासकीय समितीच्या बैठकीत या संदर्भात चर्चा झाली, मात्र कोणतीही भूमिका अद्याप ते घेऊ शकले नाहीत.

‘‘भारत-पाकिस्तान यांच्यातील १६ जूनला होणाऱ्या सामन्याबाबत आम्ही कोणताही निर्णय घेतलेला नाही. याबाबत आम्ही केंद्र सरकारशी चर्चा करून याबाबत भूमिका निश्चित करू शकू. परंतु आयसीसीकडे आम्ही दोन प्रमुख मागण्या करणार आहोत. विश्वचषक स्पर्धेत खेळाडूंची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात यावी आणि दहशतवादाला चालना देणाऱ्या कोणत्याही राष्ट्राविरोधात सामने खेळू नयेत,’’ असे प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी सांगितले.

पाकिस्तानची विश्वचषक स्पर्धेतून हकालपट्टी करावी, अशी प्रशासकीय समिती आणि ‘बीसीसीआय’ हे ‘आयसीसी’कडे मागणी करणार असल्याचे म्हटले जात होते. मात्र विश्वचषक स्पर्धेच्या नियमावलीत अशा प्रकारे कोणत्याही संघाला स्पर्धेबाहेर काढण्याचा नियम नाही.

माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि मोहम्मद अझरुद्दीन यांनी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालण्याची मागणी केली आहे. मात्र माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी म्हटले की, पाकिस्तानविरुद्धचा सामना न खेळून त्यांना दोन गुण देऊ नयेत.

आयपीएल उद्घाटन सोहळ्याऐवजी शहिदांच्या कुटुंबीयांना मदत

नवी दिल्ली : येत्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या उद्घाटन सोहळ्याला कात्री लावण्यात आली आहे. उद्घाटन सोहळ्यासाठीची नियोजित रक्कम पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी देण्यात येणार आहे, असा निर्णय ‘बीसीसीआय’च्या प्रशासकीय समितीने घेतला आहे. ‘आयपीएल’च्या १२व्या पर्वाला २३ मार्चपासून प्रारंभ होणार आहे. मात्र दर वर्षीप्रमाणे बॉलीवूडच्या तारेतारकांच्या अदाकारीचा समावेश असलेला उद्घाटन कार्यक्रम या वेळी होणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2019 12:50 am

Web Title: india pakistan match decision after the discussion with the government
Next Stories
1 श्रीलंका विजयाच्या उंबरठय़ावर
2 ‘पाकिस्तानशी क्रीडा संबंध तोडू नका’
3 अबब! अवघ्या ९ धावांत संघ All Out, ९ गडी शून्यावर बाद
Just Now!
X