भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट मालिका दोन भागांत खेळविण्यात येणार असून एकदिवसीय मालिका श्रीलंकेत, तर कसोटी मालिका इंग्लंडमध्ये खेळविण्यात येणार असल्याचे वृत्त सूत्रांकडून मिळत आहे.

एकदिवसीय मालिका डिसेंबरमध्य़े, तर कसोटी मालिका पुढील वर्षी खेळविण्याचा प्रस्ताव दोन्ही देशांच्या संघटनांच्या विचाराधीन असल्याचे समजते. दुबईत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष शशांक मनोहर आणि पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) अध्यक्ष शहरयार खान यांच्यात चर्चा झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून याबबत अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.
‘‘पाकिस्तानचे पंतप्रधान नवाब शरीफ आणि पराराष्ट्र मंत्री यांच्याकडून भारताविरुद्ध पुढील महिन्यात श्रीलंकेत एकदिवसीय मालिका खेळण्याची परवानगी शहरयार खान यांनी मिळवली आहे,’’ असे आंतर – प्रांतिक समन्वय मंत्रालयातील सूत्राने सांगितले. तसेच शहरयार यांनी भारताने पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिका खेळण्याची तयारी दर्शविल्याचेही सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.
‘‘२०१७मध्ये भारत पाकिस्तानविरुद्ध पूर्ण मालिका खेळणार आहे. तत्पूर्वी होणारी मालिका दोन भागात होईल. त्यातील कसोटी मालिका पुढील वर्षी इंग्लंडमध्ये होईल,’’ असे त्यांनी सांगितले. या मालिकेसाठी इंग्लंड अ‍ॅण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाचे प्रमुख जाइल्स क्लार्क यांनी बीसीसीआय आणि पीसीबी यांच्यात मध्यस्थी केली.