ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी उभय संघांचा एकाच गटात समावेश

पीटीआय, दुबई

दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पध्र्यामधील जुगलबंदी चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. संयुक्त अरब अमिराती येथे होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारत, पाकिस्तान या दोन्ही संघांचा एकाच गटात समावेश करण्यात आला आहे.

अमिराती येथे १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबरदरम्यान विश्वचषकाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) शुक्रवारी १२ संघांची दोन गटांत विभागणी केली. आतापर्यंत १२ संघांमधील आठ संघांचे स्थान क्रमवारीच्या आधारे निश्चित झाले असून चार संघ पात्रता फेरीद्वारे पुढील फेरीत प्रवेश करतील.

भारत आणि पाकिस्तान २०१९मध्ये इंग्लंडला झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात अखेरचे आमनेसामने आले आहेत. त्यामुळे आता चाहत्यांना स्पर्धेचे वेळापत्रक कधी जाहीर होते, याची उत्कंठा लागली आहे. भारताच्या गटात पाकिस्तानसह गेल्या महिन्यातच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा जिंकणारा न्यूझीलंड, अफगाणिस्तान यांचा समावेश करण्यात आला आहे. अन्य गटात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका यांसारख्या बलाढय़ संघांना स्थान लाभले आहे. २०१६नंतर प्रथमच ट्वेन्टी-२० विश्वचषक रंगणार असून त्यावेळी विंडीजने जगज्जेतेपद मिळवले होते.

पात्रता फेरीतील पहिल्या गटात श्रीलंका, आर्यलड, नेदरलँड्स, नामिबिआ हे चार संघ एकमेकांविरुद्ध खेळतील, तर दुसऱ्या गटात बांगलादेश, ओमान, पापुआ न्यू गेनुआ आणि स्कॉटलंड यांचा समावेश आहे.

’ पहिला गट : इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, पात्रता फेरीच्या ‘अ’ गटातील विजेता, पात्रता फेरीच्या ‘ब’ गटातील उपविजेता

’ दुसरा गट : भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, पात्रता फेरीच्या ‘ब’ गटातील विजेता, पात्रता फेरीच्या ‘अ’ गटातील उपविजेता