बुद्धिबळ हा भारतामधील प्राचीन खेळ मानला जात असला तरी आपल्या देशात खऱ्या अर्थाने या खेळाला चालना मिळाली ती विश्वनाथन आनंद याने विश्वविजेतेपद मिळविल्यानंतरच. या खेळात कारकीर्द घडवता येते हे त्याने दाखवून दिले. त्यामुळेच भारतात अनेक ग्रँडमास्टर व आंतरराष्ट्रीय मास्टर घडले आहेत. नॉर्वेत नुकत्याच झालेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताने ऐतिहासिक कांस्यपदक मिळवीत या ‘आनंद’मार्गीनी सर्वाचेच लक्ष वेधून घेतले आहे.  
बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा गेली ४१ वर्षे आयोजित केली जात आहे, मात्र या स्पर्धेत पदक मिळविण्यासाठी भारताला एवढी वर्षे वाट पाहावी लागली. हे पदक मिळविण्याचे श्रेय परिमार्जन नेगी, बी. अधिबन, कृष्णन शशिकिरण, पी. हरिकृष्ण, एस. पी. सेतुरामन यांना द्यावे लागेल. शेवटच्या फेरीतील महत्त्वपूर्ण लढतीत भारताने उझबेकिस्तानला ३.५-०.५ अशा गुणांनी हरविले. या लढतीत भारताने एकही डाव गमावला नाही. चीनने अन्य संघांना मागे टाकत सुवर्णपदक जिंकले. दुसऱ्या क्रमांकासाठी हंगेरी, भारत, रशिया व अझरबैजान यांच्यात चुरस होती. या सर्वाचेच समान गुण झाल्यानंतर प्रगत गुणांच्या आधारे हंगेरीने रौप्यपदक मिळविले, तर भारताने रशिया व अझरबैजान या बलाढय़ देशांना मागे टाकून कांस्यपदकावर आपली मोहोर नोंदविली. शशिकिरण याने वैयक्तिक रौप्यपदक मिळविले, तर महिलांमध्ये पद्मिनी राऊत या युवा खेळाडूने सोनेरी कामगिरी केली.
हे यश भारताने या खेळात केलेल्या प्रगतीचे द्योतकच आहे. गेल्या वीस वर्षांमध्ये भारताच्या अनेक खेळाडूंनी विविध वयोगटांत जागतिक स्तरावरील स्पर्धामध्ये विजेतेपदाची कमाई केली आहे. आनंदने केवळ एकदा नव्हे, तर पाच वेळा विश्वविजेतेपदाच्या मुकुटावर आपले नाव कोरले आहे. १५ वर्षांपूर्वी भारतीय खेळाडूंची फारशी कोणी दखल घेत नव्हते. आता मात्र भारतीय खेळाडूंबाबत परदेशी खेळाडू विशेषत: रशियन खेळाडूही जरा सावधच भूमिका घेतात. भारतीय खेळाडू केव्हाही अनपेक्षित विजय नोंदवू शकतात, याची जाणीव त्यांना झाली आहे.
या कांस्यपदकामुळे भारताला जागतिक सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळणार आहे. शशिकिरण, हरिकृष्ण, अधिबन यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धामध्ये अव्वल दर्जाचे यश मिळविले आहे. या खेळात प्रामुख्याने आव्हान निर्माण करणाऱ्या रशिया व चीनच्या खेळाडूंचे तंत्र, आक्रमणाची शैली आदी गोष्टींचा अभ्यास त्यांनी केला असल्यामुळेच त्यांना हे यश मिळविता आले आहे.
आनंदने बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये २००६ नंतर भाग घेतलेला नाही. तो असताना भारताला या स्पर्धेत पदक मिळविता आले नव्हते. आनंदच्या अनुपस्थितीत भारताला हे यश मिळविता आले, असे कांस्यपदक विजेत्या संघातील परिमार्जन नेगी याने बोलूनही दाखविले आहे. अर्थात त्यामुळे आनंदचे महत्त्व कमी होत नाही. आनंदला भारतामधील बुद्धिबळ युगकर्ताच म्हटले जाते. त्याने भारतात जागतिक अजिंक्यपदाची पात्रता स्पर्धा आयोजित केली. देशातील एक हजारहून अधिक शालेय खेळाडूंना त्याने ही स्पर्धा प्रत्यक्ष पाहण्याची संधी दिली. त्यामुळे अनेकांना या खेळात कारकीर्द घडवण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. शशिकिरण, हरिकृष्ण यांच्यासह अनेक खेळाडू अशा प्रेरणेमुळेच तयार झाले आहेत ही गोष्ट हे खेळाडूही नाकारू शकत नाहीत.
कांस्यपदक मिळविल्यानंतर नेगी याने मुक्ताफळे उधळण्यास सुरुवात केली आहे. बुद्धिबळात कारकीर्द घडवत राहिल्यास ऐषारामाचे जीवन जगता येत नाही. त्याऐवजी अमेरिकेत उच्च शिक्षण घेतल्यास गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळविता येईल आणि चांगले जीवन जगणे शक्य होईल, असे मत त्याने व्यक्त केले आहे. अमेरिकेत शिक्षणासाठी त्याने पेट्रोलियम कंपनीतील नोकरीचा राजीनामा देण्याचे ठरविले आहे. नेगी याचे वक्तव्य खरोखरीच खेदजनक आहे. कारण पेट्रोलियम कंपनीत काम करणाऱ्या खेळाडूंना भरपूर सुविधा व सवलती मिळत असतात. त्यांना फारच क्वचित काम करावे लागते. नेगीच्या वक्तव्यामुळे यापुढे खेळाडूंना नोकरीत घेताना पेट्रोलियम मंडळ निश्चित चार वेळा विचार करील.
आनंदने पाच वेळा विश्वविजेतेपद मिळविले असले तरी तो अजूनही जमिनीवरच आहे. नेगीसारख्या युवा खेळाडूने असे वर्तन करणे अयोग्य आहे. त्याच्यामुळे भारताच्या कांस्यपदकास काळा डाग लागण्याची शक्यता आहे. सांघिक विभागातील कांस्यपदकापेक्षाही विश्वविजेतेपद हे खूप कठीण आव्हान आहे. नेगी, शशिकिरण, हरिकृष्ण यांनी ते लक्ष्य साध्य करण्याचा प्रयत्न केला पाहिजे तरच आनंदचा वारसा पुढे सुरू राहील.