सिडनी : भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरसाठी गुरुवारचा दिवस आनंदाची दुहेरी पर्वणी देणारा ठरला. विश्वचषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या भारताला अंतिम फेरीत पोहोचविणारी पहिली कर्णधार ठरण्याचा मान हरमनप्रीतला मिळाला.

उपांत्य फेरीसाठी प्रत्यक्षात मैदानावर न उतरताही अंतिम लढतीत प्रवेश मिळाल्यामुळे हरमनप्रीत एकीकडे आनंदी असली तरी या नियमांत फेरबदल करण्याचेसुद्धा सुचवले आहे. त्याशिवाय आई-वडिलांसमोर खेळण्याची इच्छा पूर्ण न झाल्यामुळे तिने नाराजीही प्रकट केली.

‘‘कारकीर्दीत पहिल्यांदाच माझे आई-वडील एखाद्या आंतरराष्ट्रीय सामन्यात माझा खेळ पाहण्यासाठी उपस्थित होते. दुर्दैवाने आज त्यांची इच्छा पूर्ण झाली नाही. परंतु अंतिम सामन्यासाठी मी त्यांना नक्कीच येण्याची विनंती करेन,’’ असे ३० वर्षीय हरमनप्रीत म्हणाली. जागतिक महिला दिन म्हणजेच ८ मार्च रोजी रंगणाऱ्या अंतिम सामन्याच्या दिवशीच हरमनप्रीत ३१वा वाढदिवसही साजरा करणार आहे. त्यामुळे ती भारताला विश्वचषकाची भेट देण्यात यशस्वी होणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

‘‘निश्चितच उपांत्य सामन्यात इंग्लंडला नमवून अंतिम फेरी गाठण्यात आम्हाला अधिक आनंद झाला असता. परंतु क्रिकेटमध्ये काही नियमांचे पूर्वीपासून पालन करण्यात आलेले आहे. त्यामुळे आम्हीही त्याविरोधात काही करू शकत नाही. मात्र या नियमांत बदल करण्याची आवश्यकता आहे, असे मला वाटते,’’ असेही हरमनप्रीतने सांगितले.

अंतिम फेरीत भारताला पाठिंबा दर्शवण्यासाठी चाहत्यांनी मोठय़ा प्रमाणावर स्टेडियममध्ये गर्दी करावी, अशी विनवणीही हरमनप्रीतने केली आहे. ‘‘संघातील प्रत्येक खेळाडूने केलेली मेहनत आणि चाहत्यांच्या पाठिंब्यामुळेच आम्ही अंतिम फेरी गाठू शकलो. परंतु अंतिम लढतीसाठीही आम्हाला तुमच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. तुमची साथ आम्हाला विश्वचषकासह मायदेशी परतण्यासाठी प्रेरणादायी ठरेल,’’ असे हरमनप्रीत म्हणाली.